Breaking newsHead linesWorld update

मोदी सरकारकडून न्यायाधीशांची हेरगिरी, त्यांना ब्लॅकमेल!

– केंद्र सरकारकडून तपास यंत्रणा, गुप्तहेर यंत्रणांचाही गैरवापर सुरु
– देशात लोकपाल आंदोलनापेक्षाही मोठ्या आंदोलनाची गरज

नागपूर (जिल्हा प्रतिनिधी) – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे न्यायाधीशांची हेरगिरी करुन त्यांना ब्लॅकमेल करते. शिवाय, केंद्र सरकारकडून तपास यंत्रणा, गुप्तहेर यंत्रणांचा गैरवापर सुरु असल्याचा अतिशय गंभीर आरोप ज्येष्ठ विधिज्ज्ञ तथा समाजसेवक प्रशांत भूषण यांनी केला आहे. नागपुरात एका संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रशांत भूषण बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकार न्यायंत्रणेतील प्रत्येक न्यायाधीशाची हेरगिरी करून त्यांच्या जीवनातील कच्चे दुवे शोधून ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप करत त्यांनी खळबळ उडवून दिली.

प्रशांत भूषण म्हणाले, की सरकारच्या हेरगिरीच्या फेर्‍यात अडकलेला न्यायाधीश आणि सरन्यायाधीश असतील तर अर्धी न्यायंत्रणाच तुमच्या हातात येऊन जाते. कारण सरन्यायाधीशच विविध खटल्यांचे वाटप विविध न्यायाधीशांना करतात, असे सांगून, त्यांनी काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायाधीशांनी असाच एक मुद्दा उचलून केलेल्या आरोपणकडे ही लक्ष वेधले. मोदी सरकार सर्व तपास यंत्रणा आणि गुप्तहेर यंत्रणांचा वापर करून प्रत्येक न्यायाधीशाचा एक डोजियर तयार करते आणि त्या डोजियरमध्ये न्यायाधीशाचा कुठलाही कच्चा दुवा लक्षात आल्यावर त्याचा वापर करून न्यायाधीशावर दबाव आणला जातो. याबरोबरच त्या न्यायाधीशाला ब्लॅकमेल केले जाते, असे गंभीर आरोप प्रशांत भूषण यांनी केले आहेत. पुढे त्याच गोष्टींचा वापर करून न्यायाधीशांच्या निर्णयांवर प्रभावही पाडला जातो. मोदी सरकारमध्ये सध्या हे खूप धोकादायक ट्रेंड पाहायला मिळत असल्याचे प्रशांत भूषण म्हणाले.
मोदी सरकार न्यायपालिकेसह निवडणूक आयोग आणि इतर स्वायत्त संस्थांच्या कारभारात हस्तक्षेप करून लोकशाही धोक्यात आणत असल्याचा आरोपही प्रशांत भूषण यांनी केला. बेरोजगारीपासून सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावर आता देशात लोकपाल पेक्षाही मोठे जनआंदोलन उभे केले पाहिजे, अशी अपेक्षा प्रशांत भूषण यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!