झायलो गाडीत कोंबून गोवंशाची तस्करी; पोलिसांना पाहताच चोरटे गाडी सोडून पळाले!
जालना (जिल्हा प्रतिनिधी) – राजूर गणपती या प्रसिद्ध तीर्थस्थानाच्या गावातून तीन गाई व दोन वासरांना महिंद्रा कंपनीच्या झायलो गाडीत अक्षरशः पोते कोंबावेत तसे कोंबून त्यांना जालना-भोकरदन मार्गाने घेऊन जाणार्या गोवंश तस्करांची तस्करी हसनाबाद पोलिसांच्या सतर्कतेने उघडकीस आली. पोलिसांनी गाडी अडविण्याचा प्रयत्न करताच गाडी सोडून या तस्करांनी अंधाराचा गैरफायदा घेत पळ काढला. त्यामुळे गोवंशाला जीवदान मिळाले आहे. पोलिसांच्या या सतर्कतेबद्दल कौतुक होत आहे. कालच्या मध्यरात्री ही घटना घडली.
राजूर गणपती येथून एका लाल रंगाच्या महिंद्रा कंपनीच्या झायलो गाडी (क्रमांक एमएच ३१ डीजे १७६६) च्या मागील बाजूजी सर्व सीट काढून गोवंशाची ही पाच जनावरे पोत्यावर पोते रचल्याप्रमाणे ठेऊन, त्यांचे पाय व तोंड बांधून अक्षरशः कोंबली होती. ही गाडी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास जालना-भोकरदन मुख्य मार्ग वरून जात असताना, गस्तीवर असलेल्या हसनाबाद पोलिस ठाण्यातील राजूर चौकीच्या पोलिसांना आढळून आली. पोलिसांना या गाडीचा संशय आल्याने तिला थांबविण्याचा इशारा करताच चालक व त्याचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेत गाडी सोडून पळून गेले.
पोलिस उपनिरीक्षक संतोष घोडके यांच्या नेतृत्वाखाली गोवंशाच्या या जनावरांना वाचविण्यात या कारवाईने पोलिसांना यश आले. पोलिसांनी तातडीने गाडीची झडती घेतली असता त्यांना मोठाच धक्का बसला. त्यांनी तातडीने अर्धमेली झालेली ही जनावरे मोकळी करून त्यांची सुटका केली व पशुवैद्यकाला बोलावून त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून, अतिदाब व गुदमरल्याने एक गाय ठार झाली आहे. ज्या शेतकर्यांची ही जनावरे असतील ती त्यांनी ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अज्ञात आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यांचा कसून शोध सुरु होता. रात्रीच्यावेळी व्हीआयपी कार किंवा संशयास्पद वाहन आढळल्यास तातडीने पोलिसांना कळविण्यात यावे. शेतकर्यांनी आपल्या गोवंशीय जनावरांची सुरक्षा बाळगावी, असे आवाहन हसनाबादचे पोलिस उपनिरीक्षक संतोष घोडले यांनी केले आहे.