अमरावती आयजींच्या नावाने पोलिस अधिकार्यांनाच मागितली खंडणी!
– म्हणे, आयजी तुमच्यावर नाराज आहे, बदली नको असेल तर पैसे द्या!
अकोला (जिल्हा प्रतिनिधी) – एका मोठ्या दैनिकाचा पत्रकार असलेल्या अकोट येथील पत्रकाराने चक्क अमरावती विभागीय महानिरीक्षक (आयजी) चंद्रकिशोर मीणा यांच्या नावानेच दोन पोलिस अधिकार्यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मागणी करून, बदली करू देणार नाही, असे आश्वासन दिले. या पत्रकाराची पत्नीही पोलिस अधिकारी असल्याचे सांगण्यात येते. संबंधित अधिकार्यांनी याबाबत थेट अकोला पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधत, या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यामुळे संतप्त झालेले चंद्रकिशोर मीणा हे अकोट पोलिस ठाण्यात येऊन संबंधित पत्रकाराची तब्बल अडिच तास कसून चौकशी केली. तूर्त गुन्हे दाखल झाले नसले तरी, आयपीएस अधिकार्यामार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.
मुकुंद नावाच्या या पत्रकाराने अकोट शहराचे पोलिस निरीक्षक आणि हिवरखेडचे तत्कालिन ठाणेदार मनोज लांडगे यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मागणी केल्याचे चर्चेत आले आहे. ‘आयची साहेब’ सध्या तुमच्यावर नाराज आहे, बहुतेक तुमची बदली करण्याच्या स्थितीत आहेत, असे म्हणत या पत्रकाराने या दोन्ही अधिकार्यांकडे पैशाची मागणी केली. सूत्रांच्या माहितीनुसार, या दोन्ही अधिकार्यांनी त्यांना लाखोंच्या घरात पैसे दिल्याचीदेखील चर्चा होत आहे. याची माहिती चंद्रकिशोर मीणा यांना मिळताच, त्यांनी अकोट शहर पोलिस ठाणे गाठले अन् या पत्रकाराला ठाण्यात बोलवण्यात आले. त्याची तब्बल अडिच तास चौकशी करून नंतर सोडून देण्यात आले. सद्यस्थितीत या प्रकरणी कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाल नसून याची चौकशी आयपीएस रितू खोकर या करीत आहे.
—
असा गंडवित होता पोलिस अधिकार्यांना….
अकोटच्या या भामट्या पत्रकाराने एक मोबाईल नंबर अमरावती विभागाचे आयजी चंदकिशोर मीणा यांच्या नावाने आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह केला. अन् यानंबरचे व्हाट्सअपदेखील सुरु केले. त्याचे प्रोफाइल म्हणून मीणा यांचा फोटो ठेवला. मग, मुकुंद हा ‘ज्या’ अधिकार्यांकडे पैशाची मागणीसाठी जायचा, या अगोदर बनावट नंबरहून मीणा यांच्या नावाने व्हाट्सअपवर आलेले मेसेज संबंधित अधिकार्यांना दाखवून पैशाची मागणी असलेले आकडे त्यांना दाखवत असायचा. ‘साहेब तुमच्यावर फार रागवलेले आहे, तुमची बदलीची शक्यता आहे, ती थांबवू शकतो, जे पोलिस वादात असून त्यांची चौकशी सुरु आहे यातून त्यांना क्लीन चीट देण्यात येईल, असे आमिष तो दाखवायचा. ही बाब संबंधितांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांसह थेट चंद्रकिशोर मीणा यांच्या कानावर टाकली. त्यानंतर संतप्त झालेले मीणा हे अकोटात येऊन या पत्रकाराची चांगलीच कान उघाडणी केली व तपासाचे आदेश दिले आहेत.
अकोल्याचे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या गंभीर प्रकाराबाबत हा पत्रकार ज्या मोठ्या दैनिकात काम करत होता, त्या दैनिकाच्या संपादकाशी चर्चा केली व त्यांना माहिती दिली. पोलिसांच्या माहितीतील तथ्य पाहाता, त्या दैनिकाने त्याची हकालपट्टी केली असल्याचे पुढे आले आहे. अकोटच्या या पत्रकाराने आयजींच्या नावावर किती पैसे गोळा केले, आतापर्यंत किती जणांना गंडविले, याचा तपास आता आयपीएस रितू चौधरी या करत आहेत. या पत्रकाराची पत्नीही पोलिस अधिकारी असल्याने हा तपास निष्पक्ष होतो की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.