नवी दिल्ली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या देशभरातील ९३ ठिकाणांवर एनआयए, ईडी आणि संबंधित राज्यांचे एटीएस यांनी संयुक्तपणे छापे मारून देशभरात १०६ जणांना अटक केली होती. या छापेमारीच्या विरोधात पीएफआय संघटनेने आज केरळ बंदची हाक दिली होती. या बंदला हिंसक वळण लागले असून, संतप्त जमावाने वाहनांची तोडफोड करत जाळपोळ केली. सरकारी बसेस, कार्यालयेदेखील फोडण्यात आली. कोल्लम येथे गस्तीवर असलेल्या पोलिसांवर हल्ले करण्यात आले. दरम्यान, केरळ उच्च न्यायालयाने या हिंसाचारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, आंदोलकांना फटकारले आहे.
केरळ उच्च न्यायालयाने बंद पुकारून हिंसाचार करणार्या पीएफआयच्या नेत्यांविरुद्ध स्वतःच दखल घेतली (सुमोटो) कुणीही विनापरवानगी बंद पुकारू शकत नाही. अटकेनंतर तर असल्या प्रकारचा बंद व हिंसाचार याचे समर्थन होऊ शकत नाही, असे सांगत न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर असल्याचे जाहीर केले. त्यामुळे राज्य सरकारला आंदोलकांविरुद्ध कारवाईचे अधिकार प्राप्त झाले आहेत.
केरळ ते पश्चिम बंगालपर्यंत छापेमारी, १०६ अटक
एनआयए व ईडीने काल मध्यरात्रीपासून पीएफआयच्या कार्यालयांवर छापे मारण्यास सुरुवात केली होती. उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगना, तामिळनाडू, आसाम, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, पुदुचेरी, ओदिशा, राजस्थान या राज्यांत छापे मारण्यात आले होते. या कारवाईत एनआयएचे ३०० पेक्षा जास्त अधिकारी सहभागी झाले होते. या कारवाईत पीएफआयचे १०६ नेते, पदाधिकारी यांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये केरळमधून २२, कर्नाटक व महाराष्ट्रातून प्रत्येकी २० तर तामिळनाडूतून १० जणांचा समावेश आहे. या सर्वांवर दहशतवाद्यांना अर्थपुरवठा केल्याचा आरोप आहे. तसेच,देशातील दहशतवादी कारवायांमागे हेच छुपे हस्तक होते, असे एनआयएचे म्हणणे आहे.
या धाडी का टाकल्यात? चोवीसतासांच्याआत पुरावे द्या !: प्रकाश आंबेडकर
या धाडी आपण का टाकल्या? आपल्याकडे यांच्याविरोधात काय होतं? आणि आपण जे कागदपत्र गोळा केलेले आहेत, त्यात किती निधी मिळाला? देशविरोधी कारवायांचे किती कागदपत्रे मिळाले? हे या यंत्रणांनी येत्या २४ तासात लोकांसमोर मांडावं, असे आवाहन केंद्रीय तपास यंत्रणांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तपास यंत्रणांना २४ तासात हे मांडता आलं नाही, तर सामान्य माणूस हेच लक्षात घेईल की, भाजपचा जो मुस्लिम विरोधी अजेंडा आहे, तो पुढे करण्याकरिताच या धाडी टाकण्यात आल्या आहेत. असे असेल तर वंचित बहुजन आघाडी या धाडींचा निषेध करते, असेही त्यांनी म्हटले आहे.
——————-