CrimeMaharashtraPachhim Maharashtra

राष्ट्रवादीचे नेते, माजी महापौर मनोहर सपाटेंवर बलात्कार, खंडणीचा गुन्हा दाखल

– सोलापूरच्या राजकारणात खळबळ, गुन्हा दाखल होताच सपाटे फरार?

सोलापूर (विशेष प्रतिनिधी) – संस्थेतल्या विधवा शिक्षिकेसोबत जवळीक साधत, तिला लग्नाचे आमिष दाखवत, तसेच नोकरीतून काढून टाकण्याची धमकी देत, तिच्यावर अनेक वर्षांपासून नैसर्गिक व अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप सोलापूरचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर सपाटे यांच्यावर पीडित महिलेने केला असून, फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीवरून सपाटे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या शिक्षिकेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सपाटेंवर खंडणीचा, अनैसर्गिक अत्याचार अन् अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी प्रशासनाला निवेदन देऊन सपाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, काल रात्री उशिरा का होईना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परंतु, त्यानंतर आरोपी मनोहर सपाटे सोलापुरातून फरार झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

या विधवा शिक्षिकेने याबाबत एकदा विनयभंगाची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाणे गाठले होते, परंतु तिला सपाटे यांनी गावठी बंदूक दाखवत, भावाला आणि त्यांनाही जीवे ठार मारण्याची धमकी देत, तक्रार मागे घेण्यास सांगितले, असे फिर्यादीत नमूद आहे. तिच्यासोबत लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत सपाटेंनी शारीरिक संबंध ठेवले. तिने विरोध केल्यानंतर तुला संस्थेतून काढून टाकेन, तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करेन, असे सांगत तिच्यावर वेळोवेळी नैसर्गिक व अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पीडित महिलेची इच्छा नसतानाही तिच्याकडून राजीनामा लिहून घेतला गेला. निवृत्तीचे पैसे देण्यासाठी व जमिनीच्या व्यवहारातील असे एकूण दहा लाख रुपये जबरदस्तीने घेतले, अशी तक्रार या महिलेने केली आहे. सपाटे यांनी १९९३ पासून अनेकदा दुष्कर्म केले, २०२१ मध्ये दहा लाखाची खंडणी तर २८ जून २०२२ रोजी पुस्तकाचा धाक दाखवून दुष्कर्म केल्याचा गंभीर आरोपही या विधवा शिक्षिकेने केला आहे. त्यानुसार मनोहर सपाटे यांच्यावर कलम ३७६, ३८४, ५०६, ३७७ या नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकच खळबळ उडाली आहे.

या पीडितेने फिर्याद देताना असेही पोलिसांना सांगितले, की माझे वय २८ जून २०२२ रोजी ५९ असतांना, मंदिरात पूजेसाठी गेले होते. त्यावेळी मनोहर सपाटे हा मंदिरात आला व जीवे मारण्याची धमकी देत, मंदिराच्या आवारात असलेल्या पत्राशेडमध्ये घेऊन जाऊन पिस्तुलाचा धाक दाखवत पिस्तुल डोक्यावर लावली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि अमानुष लैंगिक अत्याचार केला. १९९३ पासून पीडित विधवा महिलेवर मनोहर सपाटे हा शारीरिक, मानसिक त्रास देत अत्याचार केला आहे. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक देशमुख करत आहेत.


‘तू जवानीत विधवा झाली, माझ्याशी संबंध ठेव’ म्हणत केले अनैसर्गिक अत्याचार!

सोलापुरातील एका खाजगी संस्थेत सोलापूरचे तत्कालीन महापौर या नात्याने मनोहर सपाटे यांना बोलावण्यात आले होते. त्या खाजगी संस्थेत नोकरीला असणार्‍या विधवा शिक्षिकेवर सपाटेची वाईट नजर पडली. कार्यक्रमानंतर त्यांनी या शिक्षिकेस कार्यालयात ‘तू जवानीमध्ये विधवा झाली, तू माझे ऐकत जा, तू मला खूप आवडतेस, माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, अन्यथा तुला नोकरीवरून काढून टाकतो’ अशी धमकी देत, १५ ऑगस्ट १९९३ साली पहिल्यांदा बलात्कार केला. त्यानंतर अनेकवेळा वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन त्या विधवा शिक्षिकेवर नैसर्गिक व अनैसर्गिक बलात्कार केला, अशी फिर्याद सदर महिलेने सोलापूर शहर येथील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात केलेली आहे. पीडित विधवा महिलेवर सपाटे हा तिच्या वयाच्या ५९ व्या वर्षीदेखील नैसर्गिक व अनैसर्गिक बलात्कार करत होता.
——————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!