Breaking newsHead linesMaharashtraPune

गुजरातने पळविलेला एवढा मोठा प्रकल्प पुन्हा येणे शक्य नाही; शरद पवारांनी स्पष्टच सांगितले!

– या आधीची परिस्थिती अशी होती की महाराष्ट्र नेहमी गुंतवणुकीच्या बाबतीत एक नंबरला असायचा. काही नेते आणि अधिकारी हे नेहमी गुंतवणूक कशी येईल, याकडे लक्ष द्यायचे. आताची परिस्थिती पाहता ते दिसत नाही!

पुणे (विशेष प्रतिनिधी) – तब्बल दीड लाख रोजगार निर्माण करणारा पुण्यातून निसटलेला वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्प आता गुजरातमधून पुन्हा महाराष्ट्रात येणे अशक्य आहे, तसे जर पंतप्रधानांनी केले तर त्याचे स्वागतच आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर आता चर्चा करण्याला कोणताही अर्थ नाही, असे स्पष्ट केले. साधारणतः केंद्राची सत्ता हातात असण्याचे परिणाम काही राज्यांसाठी अनुकूल होत असतात. त्याप्रमाणे जर गुजरातला याचा फायदा मिळाला तर आपण काही तक्रार करण्याचे कारण नाही. नरेंद्र मोदी, अमित शाह हे तिथले आहेत, हे मोठे लोक आहेत, त्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत. त्यामुळे त्यांनी थोड जास्त लक्ष गुजरातकडे दिले तर आपण समजू शकतो, असेही पवारांनी समजावले.

पुण्यात शरद पवार यांची आज पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत पहिलाच प्रश्न ‘वेदान्त-फॉक्सकॉन’संदर्भात विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शरद पवार यांनी, ‘हा प्रकल्प तळेगावला येणार होता. त्याची चर्चा झाली होती. राज्य सरकारने आवश्यक त्या निर्णयाची तयारी केली होती. पण नंतर यात बदल झाला. त्यात आता काही पर्याय मला दिसत नाही. काही लोकांनी सांगितले की हा निर्णय (गुजरातला नेण्याचा) बदलावा, महाराष्ट्रात आणावा. हे काही होणार नाही. महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जायला नको होता. पण तो गेला. आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही,’ असेही पवारांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाच्या अनुषंगाने दोन गोष्टी लक्षात आल्या आहेत. मागच्या सरकारने निर्णय घेतला नाही. त्याला उद्धव ठाकरे यांचे सरकारच हा प्रकल्प गुजरातला जाण्यास जबाबदार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे आणि उदय सामंत मंत्री होते. दोघे मंत्री मंत्रिमंडळात असताना त्या मंत्रिमंडळावर टीका करतात, हे काही शहाणपणाचं लक्षण नाही, अशी टीकाही शरद पवार यांनी केली. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली. यानंतर पंतप्रधानांकडून महाराष्ट्राला आणखी मोठा प्रोजेक्ट देण्याचे आश्वासन मिळाल्याचे उदय सामंत यांनी सांगितले, यावरही पवारांनी टोला हाणला. लहान मुलाची समजूत काढावी, तसे पंतप्रधान बोलले आहेत, असे वक्तव्य पवारांनी केले.


”मोठा प्रकल्प देतो” असे सांगणे म्हणजे लहान मुलाला समजावण्यासारखं!

‘उद्योगांमध्ये महाराष्ट्र पहिल्यापासूनच प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे. इथल्या नेतृत्वामुळे नेहमीच राज्यात नवनवे आणि मोठे प्रकल्प यायचे. पण सध्या मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे. जे झाले ते दुर्दैवी आहे. पण पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलल्यानंतर त्यांना मोठ्या प्रकल्पाचे आश्वासन दिल्याचे मी ऐकले आहे. पण फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प देतो असे सांगणे म्हणजे लहान मुलाला समजावण्यासारखे आहे, असे म्हणत पवारांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे या दोघांचीही खिल्ली उडवली. ‘कुटुंबात दोन छोटी मुलं असतात. एकाला फुगा दिल्यानंतर दुसरा रुसून बसतो. त्यावर पालक सांगतात तुला त्याच्यापेक्षा मोठा फुगा देतो…. असं आत्ता झालंय. पण आता प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने यावर चर्चा बंद करुन आता नवीन काही करता येईल हे पाहावं’, असं सांगत सत्ताधारी-विरोधकांनी आरोप प्रत्यारोप थांबवावेत, असा सल्लाही पवारांनी दिला.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!