लंडन : चार्ल्स तिसरे यांना सेंट जेम्स पॅलेसमध्ये एका ऐतिहासिक कार्यक्रमात अधिकृतरित्या ब्रिटनचे सम्राट जाहीर करण्यात आले. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर ब्रिटीश राजघराण्याच्या नियमांप्रमाणे ७३ वर्षीय प्रिन्स चार्ल्स यांची महाराजपदी निवड करण्यात आली आहे.
ब्रिटनमधील परंपरेनुसार, राणीच्या निधनानंतर २४ तासात राज्याभिषेक करण्यासाठी एक परिषद बोलावली जाते. महाराणीच्या निधनाची घोषणा उशिरा झाल्याने चार्ल्स तिसरे यांच्या राज्याभिषेक कार्यक्रमाचे आयोजनही उशीरा करण्यात आले. महाराज चार्ल्स तिसरे यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे. सेंट जेम्स पॅलेस येथे सोहळ्यात त्यांनी महाराज पदाची शपथ घेतली. चार्ल्स तिसरे यांनी काल संपूर्ण देशाला संबोधित करत असताना एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली वाहिली. यावेळी चार्ल्स यांनी एलिझाबेथ यांच्या आठवणी जागवल्या. एलिझाबेथ द्वितीय यांनी ज्या प्रकारे सार्वभौम अबाधित ठेवत सेवा केली त्याप्रमाणे कारभार करु, असे चार्ल्स म्हणाले. चार्ल्स तिसरे यांनी राज्याभिषेकानंतर विल्यम यांना प्रिन्स ऑफ वेल्स ही उपाधी दिली. तर, केट यांना प्रिन्सेस ऑफ वेल्स ही उपाधी देण्यात आली आहे. महाराणी एलिझाबेथ या ब्रिटनच्या सम्राज्ञी म्हणून गेली सात दशके कार्यरत होत्या. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.