मुख्याध्यापकाने शालेय पोषण आहाराचा तांदुळ परस्पर विकला; ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप!
– जैतखेडा (ता.कन्नड) येथील जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार; ग्रामस्थांच्या आरोपानंतर शिक्षणक्षेत्र हादरले
औरंगाबाद (संदीप गायके) – कन्नड तालुक्यातील जैतखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शेख ए. के. यांनी केलेल्या अपहाराची चौकशी व्हावी व त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी चक्क जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकले आहे. या अपहाराच्या चौकशीसाठी ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत.
जैतखेडा येथील मुख्याध्यापक शेख ए.के.यांनी आठ दिवसांपूर्वी शालेय पोषण आहारासाठी आलेला तांदूळ कुणालाही न विचारता परस्पर विकून टाकला, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. सदरील बाब ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी सोमवारी शाळेत येऊन संबंधित मुख्याध्यापकाला जाब विचारला. यावेळी मुख्याध्यापक शेख यांनी, मी तुम्हाला बांधील नसून माझे उत्तर मी माझ्या वरिष्ठांना कळवेल, असे बोलून माहिती देण्यास टाळाटाळ केली. यावेळी ग्रामस्थांनी सदरील ठिकाणी जाऊन पहाणी केली असता, भांडारगृहात तांदूळ उपलब्ध नव्हता, तसेच शाळेला मिळालेली भांडीही नव्हती. यावेळी ग्रामस्थांनी केंद्रप्रमुख श्री.शहा सर यांना शाळेवर बोलावून घेतले.ग्रामस्थांनी मुख्याध्यापक यांनी केलेल्या अपहाराचा पाढाच केंद्रप्रमुख शहा यांच्या समोर मांडला, ग्रामस्थांना अरेरावी करणे, उडवाउडवीची उत्तरे देणे, शालेय पोषण आहारासाठीचा तांदूळ परस्पर लंपास करणे, सहकारी शिक्षकांचा एकेरी उल्लेख करणे, शिक्षिकांना मानसिक त्रास देणे, विद्यार्थी तसेच पालकांकडून फिच्या नावाखाली परस्पर पैसे उकळण, असा मनमानी कारभार मुख्याध्यापक शेख यांचा चालू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
यावेळी ग्रामस्थांचा संताप पाहून मुख्याध्यापक शेख यांनी पळ काढला. सदरील बाब लक्षात घेऊन केंद्रप्रमुख शहा यांनी पंचनामा केला असून, सर्व परिस्थिती वरिष्ठांना कळविण्यात येईल, असे सांगितले. परंतु ग्रामस्थांनी झालेल्या अपहाराची चौकशी होऊन सदरील मुख्याध्यापक जोपर्यंत निलंबित होत नाही, तोपर्यंत शाळा चालू देणार नाही, असे म्हणत शाळेला कुलूप ठोकले.
यावेळी ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर वेताळ, सदस्य हरी राजगुरू, रमेश मोरे, सरपंच दिनकर कोलते, चेअरमन संगिता वेताळ, शिक्षक महाजन सर, देशमुख सर, आहेर सर, शेळके सर, वाळे मॅडम, तायडे मॅडम, वाघ मॅडम, सुभाष बळे, दैनिक पुढारीचे पत्रकार कार्तिक राजगुरू, पुरुषोत्तम वेताळ, पोलिस पाटील विजय खिल्लारे आदीसह व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.