व्यावसायिक गॅस सिलिंडर ९१.५० रुपयाने स्वस्त; घरगुती गॅस महागडाच!
मुंबई (ब्रेकिंग महाराष्ट्र) : सरकारी तेल कंपन्यांनी व्यवसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल ९१.५० रुपयांनी कपात केली असून, दुसरीकडे, घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर मात्र जैसे थेच आहेत. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंटमधील जेवण स्वस्त होण्याची शक्यता असली तरी घरातील जेवण मात्र महागडेच राहणार आहे. गॅस सिलिंडरचे नवे दर आजपासून लागू झाले आहेत. राष्ट्रीय तेल विपणन कंपन्यांनी १ सप्टेंबर म्हणजे आजपासून कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमती ९१.५ रुपयांनी कमी केल्या आहेत. तर दुसरीकडे, पेट्रोल आणि डिझेलचे दर तीन महिन्यांहून अधिक काळ स्थिर आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना या दरकपातीचा काहीही फायदा झालेला नाही.
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सलग पाचव्यांदा कपात करण्यात आली आहे. १९ मे २०२२ रोजी २,३५४ रुपयांच्या विक्रमी किमतीवर पोहोचलेल्या गॅस सिलिंडरची किंमत १ जून रोजी २,२१९ रुपये होती. महिनाभरानंतर सिलिंडरची किंमत ९८ रुपयांनी कमी होऊन ती २,०२१ रुपये झाली होती. ६ जुलै रोजी तेल कंपन्यांनी या सिलिंडरची किंमत २,०१२.५० रुपये केली. १ ऑगस्टपासून हा सिलिंडर १,९७६.५० रुपयांना मिळू लागला. आता १ सप्टेंबर म्हणजे आज, या सिलिंडरच्या दरात ९१.५ रुपयांनी कपात केल्याने तो आता १,८८५ रुपयांचा झाला आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिक यांना ऐन सणासुदीत थोडासा दिलासा मिळाला असला तरी, ते हॉटेलमधील जेवणाचे दर कमी करण्याची शक्यता तशी कमीच आहे.
इंडियन ऑईलने १९ किलोच्या व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांपर्यंत कमी केली आहे. त्यामुळे मुंबईत एलपीजी सिलिंडर १ हजार ८४४ रुपयांना मिळेल. मुंबईत सिलिंडरच्या दरात ९२.५० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. गेल्या महिन्यात घरगुती वापराचा सिलिंडर ५० रुपयांनी महागला होता. आता मात्र १४.२ किलोच्या सिलिंडरचे दर जैसे थेच ठेवण्यात आले आहेत.
———