BuldanaVidharbha

शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीचे बुलढाणा जिल्ह्यात उत्स्फूर्त स्वागत!

– बंडखोरांच्या मतदार संघांत संभाजी ब्रिगेड आक्रमक होणार
– नांदुरा येथे पार पडली उत्तर जिल्हा बैठक

चिखली (एकनाथ माळेकर) – शिवसेना व संभाजी ब्रिगेड यांच्यातील युतीचे बुलढाणा जिल्ह्यात जोरदार स्वागत करण्यात आले असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना कमकुवत करण्याचे बंडखोरांचे इरादे उधळून लावण्याचा निर्धार संभाजी ब्रिगेडने केला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेला संभाजी ब्रिगेडच्या रुपाने हत्तीचे बळ मिळाले आहे. संभाजी ब्रिगेडची पितृसंस्था मराठा सेवा संघाचे जिल्ह्यात प्रचंड वर्चस्व आहे. आता संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून थेट मराठा सेवा संघच उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी पहाडासारखा उभा राहिल्याने जिल्ह्यातील बंडखोर चांगलेच हादरून गेले आहेत. बंडखोरांच्या मतदार संघात आक्रमक होण्याचे संकेत संभाजी ब्रिगेडने दिले आहेत.

संभाजी ब्रिगेडच्या उत्तर जिल्हा विभागाची बैठक आज नांदुरा येथे पार पडली. या बैठकीत राजकीय रणनीती निश्चित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.गजानन पारधी हे होते तर संभाजी ब्रिगेडचे (बुलढाणा-अकोला-वाशिम) विभागीय अध्यक्ष गजाननभाऊ भोयर, बुलढाणा उत्तर जिल्हाध्यक्ष योगेश पाटील व जिल्हा पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती या बैठकीला होती. यावेळी शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीच्या अनुषंगाने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजयसिंग जाधव यांनी या बैठकीला सदिच्छा भेट देऊन, आगामी काळात शिवसेना ही संभाजी ब्रिगेडसोबत सर्व निवडणुकांमध्ये एकदिलाने काम करेल, अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांनी दिली. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांनी घोषणांच्या निनादात शिवसेना पदाधिकारी यांचे जोरदार स्वागत केले.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गजानन पारधी (अकोला) तसेच विभागीय अध्यक्ष गजाननभाऊ भोयर (वाशिम) यांनी पदाधिकार्‍यांना सविस्तर मार्गदर्शन केले. बैठीकीचे प्रास्ताविक संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांनी केले. तर बहारदार सूत्रसंचालन डॉ.शरद पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन मोताळा तालुका अध्यक्ष गणेश शिंदे यांनी केले. बैठक यशस्वी करण्यासाठी नांदुरा तालुकाध्यक्ष अमर पाटील तसेच तालुक्यातील पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. या बैठकीला खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर व मोताळा तालुक्यातील संभाजी ब्रिगेडचे जिल्हा पदाधिकारी एस.पी.संबारे, शरद पाटील, मंगेश सोळंके, डॉ.सागर महाजन सर्व तालुकाध्यक्ष अमर पाटील, गणेश शिंदे, विठ्ठल अवताडे, रामा रोठे, कृष्णा वडोदे, राहुल वनारे व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांत पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे. मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा ही प्रेरणाभूमी आहे. शिवसेना व संभाजी ब्रिगेडने स्थानिक स्वराज्य संस्थांत जोरदार काम करून राज्यासमोर आदर्श प्रस्तावित करावा आणि बंडखोरांना योग्य तो इशारा द्यावा, असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, उत्तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा राजकीय आढावा घेण्यात येऊन राजकीय रणनीती निश्चित करण्यात आली आहे.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!