खामगावात बैलपाेळा सणाला गालबाेट; दोन गटात वाद व दगडफेक!
खामगाव (ब्रेकिंग महाराष्ट्र) – बैल पोळा हा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. मात्र खामगावात या सणाला गालबोट लागले असून, क्षुल्लक कारणावरून दोन गटात वाद झाला. यावेळी दोन्ही गटाकडून दगडफेक सुद्धा करण्यात आली. मात्र पोलिसांनी वेळीच नियंत्रण मिळविल्याने अनुचित प्रकार घडला नाही. तर शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात संवेदनशील शहर म्हणून खामगाव शहर ओळखल्या जाते. तर कालच विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी भेट देवून संवेदनशील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यसाठी पोलीस दलाने कटाक्षाने लक्ष द्यावे, तसेच आगामी सण, उत्सव काळात शहरातील शांतता भंग होणार नाही. त्या दृष्टीने उपाय योजना करण्याचे निर्देश दिले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक चवरिया, अप्पर पोलीस अधीक्षक दत्त, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्यासह सर्व ठाणेदार आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
असे असताना, आज 26 ऑगस्ट रोजी खामगाव शहरात दरवर्षी पोलीस स्टेशन समोर पोळा भरतो.. आजही खामगाव मध्ये शिवाजी नगर पोलीस स्टेशन समोर पोळा भरला असताना दोन गटात क्षुल्लक कारणावरून वाद झाला, आणि हा वाद वाढत जाऊन दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी वेळीच नियंत्रण मिळवून प्रकरण शांत केले आहे. तर या घटनेमुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून सध्या खामगाव शहरात तणावपूर्ण शांतता आहे. यावेळी पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’लादेखील मिळाला असून, त्यात काही समाजकंटक दगडफेक करताना स्पष्टपणे दिसत आहेत. त्यांची ओळख पटवून पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. सामाजिक भान म्हणून आम्ही हा व्हिडिओ वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनाही फॉरवर्ड केला आहे. याबाबत, जिल्हा पोलिस चावरिया यांनी सांगितले, की या घटनेची गांभिर्याने दखल घेतली गेली असून, आम्ही समाज कंटकांची ओळख पटवत आहोत. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल.