गुलाम नबी आझाद यांच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांचेही काँग्रेस नेतृत्वावर टीकास्त्र!
– काँग्रेस नेतृत्वहीन पक्ष, ज्येष्ठांना संपविण्याचा प्रयत्न सुरु आहे – पृथ्वीराज चव्हाण
नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी) – अखिल भारतीय काँग्रेसमधील नेतृत्वावरून सुरु असलेली अंतर्गत धुसफूस अखेर चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत, जम्मू-काश्मीरमध्ये स्वतःचा राजकीय पक्ष काढण्याची तयारी चालवली आहे. दुसरीकडे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही काँग्रेस नेतृत्वावर टीकास्त्र डागत, काँग्रेस नेतृत्वहीन पक्ष झाला आहे. काँग्रेसमध्ये ज्येष्ठांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप केला आहे. चव्हाण यांनी झी २४ तास या वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली असून, त्यात त्यांनी हे आरोप करत काँग्रेसला घरचा आहेर दिला.
काँग्रेससारख्या देशातील मोठ्या पक्षाला लागलेली गळती अजूनही कायमच आहे. माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत सर्व पदांचे राजीनामे दिले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा घरघर लागली आहे. आझाद यांच्या पाठोपाठ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस नेतृत्वावर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. राज्यातील महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्वात छोटा पक्ष होतो आणि महाराष्ट्राने तीन पक्षांचे सरकार यापूर्वी कधी पाहिले नव्हते. त्यामुळे दोन पक्षाचे सरकार चालवता अनेक अडचणी येत होत्या आणि त्या मी अनुभवल्या आहेत. तीन पक्षाचे सरकार कसे चालवायचे याबाबत शंका होती. पण आम्ही किमान समान कार्यक्रम केला आणि प्रयोग केला. अडीच वर्षे चांगल्या प्रकारे सरकार चालले, असेही चव्हाण म्हणाले. काँग्रेस पक्षाबद्दल बोलताना त्यांनी, आझाद यांनी पक्ष सोडणे दुर्देवी आहे. पक्षाने आत्मपरीक्षण करावे. काँग्रेसमध्ये ज्येष्ठांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही ते म्हणाले. काँग्रेसचा अध्यक्ष कळसूत्री बाहुली नसावा. या पदावरील व्यक्ती सर्वमान्य असावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना काँग्रेस अध्यक्षांवर चव्हाण यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला.
दरम्यान, राजीनाम्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये स्वत:चा राजकीय पक्ष काढणार असल्याचे गुलाम नबी आझाद यांनी जाहीर केले आहे. १६ ऑगस्टला आझाद यांनी जम्मू काश्मीर काँग्रेस प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा देत आपल्या नाराजीचे संकेत दिले होते. त्यानंतर आता काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आझाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. तत्पूर्वी, काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून आझाद यांनी नाराजी व्यक्त केली होती. या पत्रात खासदार राहुल गांधीवर आझाद यांनी गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींमध्ये परिपक्वता असून, त्यांनी पक्षातील सल्लागार यंत्रणा उद्धवस्त केल्याचा आरोप आझाद यांनी केला. राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांसमोर सरकारी अध्यादेश फाडला, हे त्यांच्या अपरिपक्वतेचे उदाहरण असल्याचा हल्लाबोल आझाद यांनी या पत्रात केला आहे. दरम्यान, आझाद यांच्या या आरोपांचे काँग्रेसकडून खंडण करण्यात आले. आझाद यांच्या पत्राची वेळ आणि त्यातील निष्कर्ष चुकीचा आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे.