– भिसेवाडीचे शिक्षक फिरोज शहानूर शेख यांचा अनोखा उपक्रम
गंगापूर (गुलाब वाघ) – तालुक्यातील लासूरच्या जिल्हा परिषद केंद्रातर्गत येणार्या भिसेवाडी प्राथमिक शाळा येथे अभिनव उपक्रम या शाळेचे शिक्षक फिरोज शेख यांनी बैलपोळा सणानिमित्त राबविला. या सणानिमित्त बळीराजांचा सर्जा-राजांना शालेय विद्यार्थ्यांच्याहस्ते केळी, सफरचंद, मोसंबी विविध प्रकारची फळे खाऊ घालण्यात आली. विद्यार्थ्यांना पोळा सणानिमित्त गावातील जुन्या व्यक्तीकडून संपूर्ण माहिती देण्यात आली. यामध्ये गावातील शेतकरी, पालक व शिक्षक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
याबाबत माहिती देताना शिक्षक फिरोज शहानूर शेख म्हणाले, की भिसेवाडी जिल्हा परिषद शाळेत नेहमीच अभिनव उपक्रम आम्ही राबवत असतो. यावर्षी शालेय विद्यार्थ्यांना पोळा सण का वं कसा साजरा करतात, व बैलांची खांदेमळणा, त्यांच्या विविध प्रकारच्या सजावटीसाठी वापरण्यात येणारे साहित्य व त्यांची ओळख व नावे समजण्यासाठी पोळ्याची सुट्टी असतानासुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले. बैलाच्या आंघोळीपासून रंगरंगोटी व विविध सजावटीपर्यंत सगळे काम विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांच्यासमक्ष केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोळ्याची इत्थंभूत माहिती मिळाली व पोळ्याचा परिपूर्ण आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. शिक्षक शेख यांच्या या उपक्रमाचे तालुक्यातून कौतुक होत आहे.