राजेंद्र काळे
बुलडाणा : विनायकराव मेटे व बुलडाणा जिल्हा हे भावनिक ऋणानुबंध होते. मराठा आरक्षणासाठीचा एल्गार त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातीलच संतनगरी शेगाव येथून पुकारला होता. मराठा महासंघाचे नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील येरळीकर त्यांचे मार्गदर्शक होते. जगातील सर्वात भव्यदिव्य शिवस्मारक मुंबईच्या अरबी समुद्रात व्हावे, या संकल्पनेचे ते प्रणेते होते. त्यामुळे या शिवस्मारकाच्या प्रणेत्याच्या स्मृती बुलडाणा शहरात साकार होत असलेल्या भव्य शिवस्मारकात जपण्यात येतील, असे अभिवचन सर्वपक्षीय व सर्व संघटनांनी संयुक्तपणे वाहिलेल्या श्रध्दांजली सभेत देण्यात आले.
स्व.विनायकराव मेटे यांचे अपघाती निधन १४ ऑगस्ट रोजी पुणे-मुंबई महामार्गावर झाले, बुलडाणा जिल्ह्यात त्यांच्या निधनानिमित्त विविध स्तरातून शोक व्यक्त करण्यात आला. आज शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी शिवस्मारक समिती बुलडाणाच्या वतीने विनायकराव मेटे यांना सामुहिक श्रध्दांजली सभेचे आयोजन कृष्णा हॉटेलच्या सभागृहात करण्यात आले होते.
यावेळी बोलतांना माजी मंत्री आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी विनायकरावांबद्दलच्या स्मृती जागवतांना त्यांचेशी असलेले कौटुंबिक ऋणानूबंधाच्या आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याशी विनायकराव यांची ते कुठल्याही पक्षात असलेतरी कायम जवळीक राहिली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
आ.संजय गायकवाड यांनी मेटे साहेबांच्या संघर्षाच्या काळातील आठवणींना उजाळा देत, मुंबईतील भव्य शिवस्मारकाची संकल्पना साकारणार्या विनायकरावांच्या स्मृती बुलडाण्यात होत असलेल्या शिवस्मारकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या पुढे त्यांचा छोटा पुतळा उभारुन जपण्यात येतील, असे अभिवचन दिले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी चळवळीत काम करतांना मेटे साहेबांशी जुळलेली जवळीक व आलेले अनुभव कथन केले. १९९५ नंतरच्या आमदारकीच्या काळात एकत्र काम करतांना विनायकरावांशी विधिमंडळात साधल्या गेलेली जवळीक विजयराज शिंदे यांनी सांगून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडला. ज्येष्ठ नेते गोकूल शर्मा यांनी मेटे साहेबांशी आलेल्या संपर्काबाबत सांगून ते किती मोठे नेते होते, याविषयी मनोगत व्यक्त केले. शिवराय प्रतिष्ठाण मलकापूरचे अध्यक्ष साहेबराव मोरे व शिवस्मारक समिती बुलडाणाचे सचिव डॉ.विकास बाहेकर यांनीही विनायकरावांच्या आठवणी जागवल्या.
आयुष्यभर मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या विनायकराव मेटे साहेबांना शिंदे व फडणवीस सरकारने मराठा आरक्षण मिळवून देणे, हीच खरी श्रध्दांजली ठरेल, अशा शोकसंवेदना दूरध्वनीद्वारे श्रध्दांजलीपर मनोगत व्यक्त करतांना चिखलीच्या आ.सौ.श्वेताताई महाले पाटील यांनी व्यक्त केल्या.
याशिवाय, बुलडाणा बार असो. अध्यक्ष अॅड.विजय सावळे, मराठा महासंघाच्या विभागीय अध्यक्षा सौ. अनुजा सावळे पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, मराठा सेवा संघाचे डॉ.तेजराव तुपकर, होमिओपॅथी संघटनेचे डॉ.दुर्गासिंग जाधव, बलदेवराव चोपडे, राकॉ. चे डी.एस.लहाने, राजर्षी शाहू पतसंस्थेचे अध्यक्ष संदिप शेळके, पत्रकार अरुण जैन आदींनीही यावेळी श्रध्दांजलीपर मनोगते व्यक्त केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, मराठा सेवा संघाचे संजय विखे, अॅड.जयसिंग देशमुख, सुनिल सपकाळ, कुणाल गायकवाड, ओमसिंग राजपूत, राजेश हेलगे, मानकर सर, प्रा.म्हळसणे सर, गोपालसिंग राजपूत, नंदकिशोर पाटील, महादेव शेळके, नरेश शेळके, अरविंद होंडे, अनिल बावस्कर, पद्मनाभ बाहेकर ओमसिंग राजपूत, सचिन परांडे यांच्यासह बुलडाणा जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. या श्रध्दांजली सभेचे सुत्रसंचलन पत्रकार राजेंद्र काळे यांनी तर आयोजनात तुकाराम अंभोरे पाटील व शिवस्मारक समिती बुलडाणाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. शेवटी सामुहिक श्रध्दांजली अर्पित करण्यात आली.