Breaking newsHead linesMaharashtraPolitics

‘पन्नास खोके, एकदम ओके’!

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार आपल्या पहिल्या वहिल्या पावसाळी अधिवेशनाला सामोरे जात आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. यावेळी ‘५० खोके…एकदम ओके’ अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली. या घोषणाबाजीवर मुख्यमंत्री शिंदे यांनीही हसून दाद दिली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले असून, विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘५० खोके, गद्दार हाय हाय’ अशा घोषणा देत विरोधकांनी शिंदे गटातील सत्ताधारी आमदारांना लक्ष्य केले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा केला आहे.

आज सकाळपासून विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यासह सर्व विरोधकांनी एकत्र येत विधानसभेच्या पायर्‍यांवरती सरकार विरोधात आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्पादन मंत्री शंभूराजे देसाई हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी चालले होते. त्यामुळे विरोधकांनी ‘५० खोके एकदम ओके’ जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी शंभूराजे देसाई यांनीही ‘पाहिजे का?’ असे म्हणून विरोधकांना उत्तर दिले. या घोषणाबाजीनंतर सभागृहामध्येदेखील विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिंदे यांनी राष्ट्रपतींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सादर केला. तर विरोधकांची स्थगन प्रस्ताव सादर करण्याची मागणी होती. पण, ती मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली. त्यामुळे विरोधकांनी पुन्हा एकदा घोषणाबाजी करून गोंधळ घातला. या गोंधळातच, महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक विधानसभेत मंत्री गिरीष महाजन यांनी मांडले आणि विधेयक बहुमताने पारीत करण्यात आले. या विधेयकामुळे थेट सरपंच निवड जनतेतून होताना पाहायला मिळणार आहे.

आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला. सकाळी ११ वाजता अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्रोपदी मुर्मू यांची देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्द्ल अभिनंदन केले. तसेच जगदीप धनखड यांचेही उपराष्ट्रपती निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. दरम्यान आता विधिमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींचे अभिनंदन केले. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्यामुळे स्त्री शिक्षण, स्त्री हक्काला बळ मिळेल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. यासह आज अधिवेशनात नवनिर्वाचित मंत्र्याचा परिचय करण्यात आला. आज २५ हजार ८२६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना राज्य सरकारने प्रति हेक्टरी १३ हजार ६०० रुपये मदत देणार आहे. मात्र, आज विधीमंडळात सादर झालेल्या पुरवणी मागणीत याची तरतूद करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना कधी मदत मिळणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधान भवनातील सातव्या मजल्यावर पक्ष कार्यालय मिळाले आहे. शिवसेनेचे असलेल्या कार्यालयामध्ये शिंदे गटाच्या आमदारांनी जाण्याचे टाळले आहे. त्यामुळे विधिमंडळामध्ये दोन शिवसेना कार्यालय तयार झाली आहे. विधान भवनातील तिसर्‍या मजल्यावरील शिवसेना पक्ष कार्यालय ठाकरे गटाकडेच राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!