– पीकांवरील रोग, अळ्यांच्या प्रादुर्भावाबाबत केले सविस्तर मार्गदर्शन; कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाण्याचा दिला सल्ला
चिखली (तालुका प्रतिनिधी) – ऐन खरीप हंगामात झालेला मुसळधार पाऊस व तालुक्यातील बहुतांश गावांत झालेली ढगफुटी यामुळे शेतीपिकांवर बुरशीजन्य रोग, तण आणि किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम सोयाबीनमधील शेंगा उत्पादनावर आणि कपाशीच्या बोंड तयार होण्यावर होण्याची शक्यता पाहाता, तालुक्यातील शेतकरीवर्ग कमालीचा घाबरलेला आहे. या शेतकर्यांना दिलासा देत, त्यांच्याशी जीएसपी क्रॉप सायन्स या कंपनीचे तालुका प्रतिनिधी तथा कृषीतज्ज्ञ शशिकांत मिसाळ यांनी संवाद साधत, त्यांना या परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
ढगफुटीसदृश पावसामुळे मेरा बुद्रूक व शेळगाव आटोळ महसूल मंडळात मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. चिखली तालुक्यात चोहीकडे पावसामुळे पिके धोक्यात आहेत. या बदलत्या हवामानामुळे पिकांवर वेगवेगळ्या रोगांचा, अळ्यांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या नुकसानीपासून वाचविण्यासाठी मिसाळवाडी गावाचे सुपुत्र, शेतीतज्ज्ञ तथा जीएसपी क्रॉप सायन्स प्रा. लि. कंपनीचे चिखली तालुका प्रतिनिधी शशिकांत मिसाळ यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगस्टरोजी, मिसाळवाडी येथे शेतकरी संवाद कार्यक्रम घेतला. यावेळी शेतकर्यांशी बोलतांना त्यांनी विविध कीटकनाशके, बुरशीनाशके यांची माहिती दिली.या बदलत्या वातावरणामध्ये कोणत्या औषधांची फवारणी करावी, याबाबत सांगितले. सद्याच्या वातावरणामुळे वेगवेगळ्या रोगांचा व अळ्यांचा प्रादुर्भाव लक्षात घेता, कोणते औषध फवारणी करावी, कोणते कीटकनाशक, बुरशीनाशक, कोणते खत वापरावे व कमी खर्चात अधिक ऊत्पन्न कसे घेता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आजची बाजारातील परिस्थिती लक्षात घेता, हजारो कंपन्यांचे बोगस औषधी बाजारात आली आहे. यामध्ये शेतकर्यांनी योग्य त्या औषधाची निवड कशी करावी, याबाबतही त्यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
गेल्या अनेक वर्षांत पावसाचे वेळापत्रकच अनियमित बनले आहे. पावसाचा पडणारा खंड किंवा अगदी अतिवृष्टी हा प्रकार शेतकर्यांसाठी जीवघेणा आहे. तरीही कापूस आणि सोयाबीनसारखे पीक शेतकरी मोठ्या हिकमतीने टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे सांगून शशिकांत मिसाळ म्हणाले, की हवामान बदल आणि खरीप हंगाम (सोयाबीन, कापूस), उशिरा सुरू होणारा पावसाळा, अधून मधून पडणारा दुष्काळ आणि अति पाऊस यामुळे सोयाबीन व कापूस यांच्या उगवण क्षमतेवर परिणाम झाला आहे. खरीप हंगामाच्या मधोमध पडणारा मुसळधार पाऊस यामुळे बुरशीजन्य रोग, तण आणि किडींचा प्रादुर्भाव वाढून पिकांचे नुकसानही वाढलेले आहे. सोयाबीनमधील शेंगा उत्पादनावर आणि कपाशीच्या बोंड तयार होण्यावर या वाईट हवामानांचा परिणाम होत आहे. परंतु, योग्य औषधी फवारणी, खते दिली तर ही पिके वाचवता येतील, असे ते म्हणाले. सद्या पाण्याचा निचरा न होणारी जमीन आणि दमट परिस्थितीमुळे पिकांची मुळे सडण्यास अनुकूल वातावरण तयार झालेले आहे. मातीतील पोषकद्रव्ये आणि खतांची परिणामकारकता कमी झाली आहे. सोयाबीन आणि कापूस या खरीप पिकांसाठी शेंगा आणि बोंड तयार होण्याच्या आणि परिपक्वतेच्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा एकूण परिणाम उत्पादन आणि गुणवत्तेवर दिसून येण्याची शक्यता आहे, असेही शशिकांत मिसाळ (9011247493) यांनी सांगून, आपली पिके कशी वाचविता येईल, याबाबत शेतकर्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.