– मेरा बीटचा जमादार तर फोनही उचलत नाही!
चिखली (एकनाथ माळेकर) – उभ्या असलेल्या चारचाकी गाडीची चाके रिंगासह चोरून नेत चोरट्यांनी अंढेरा पोलिसांना आव्हान दिले आहे. चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथे १२ ऑगस्टरोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अंढेरा पोलिस ठाणेहद्दीत मोठ्या प्रमाणात चोर्या वाढल्या असून, पोलिस करतात काय? असा सवाल निर्माण झाला आहे. याबाबत गाडी मालकाने अंढेरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली असता, पोलिसांनी अद्याप तक्रार दाखल करून घेतलेली नाही. आमच्या स्टेशन डायरीचा संगणक खराब असल्याचे कारण पोलिस देत आहेत. अंढेरा पोलिस ठाण्याचा गलथान कारभार प्रचंड प्रमाणात वाढला असून, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या पोलिस ठाण्याच्या कारभारात सुधारणा करण्याची नितांत गरज आहे.
अंत्री खेडेकर येथे रोडला लागून गट नंबर २३६ मध्ये अनिल लहुजी गावंडे यांची चारचाकी गाडी उभी असता, १२ ऑगस्टरोजी या गाडीचे रिंगासह चारही टायर अज्ञात चोरट्यांनी काढून चोरून नेले आहे. याबाबत, अनिल गावंडे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला सांगितले, की रात्रीच्या वेळेस माझे वडील लहुजी गावंडे हे झोपलेले असताना, अज्ञात चोराने गाडीचे टायर चोरून नेले आहे. याबाबत माझे वडील लहुजी गावंडे व माझा भाऊ राजेश गावंडे हे अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये गेले असता, ठाणे अमलदारांनी स्टेशन डायरीचे संगणक खराब असल्याचे सांगून, आमची तक्रार दाखल करून न घेता, आमची दिशाभूल केली. आम्ही मेरा बुद्रुक जमदार यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. आजरोजी सुद्धा फोन केला असता बीट जमादार फोन उचलत नाही. अंढेरा पोलिस तक्रार दाखल करून न घेता, या गुन्ह्याचा तपास करण्यास तयार नसल्याने, त्यांचाच या टायर चोरांना आशीर्वाद तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अंढेरा पोलिसांनी तातडीने तक्रार दाखल करून आरोपींचा शोध लावला नाही तर जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे जाणार आहोत, अशी माहितीही गावंडे यांनी दिली आहे.
अंढेरा पोलिस ठाणे हद्दीतील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत. पोलिस रात्रीची गस्त घालत नसल्यानेच चोरटे मोकाट सुटले आहेत. एकीकडे पोलिस रात्रीची गस्त घालत नसल्याचे दिसून येत असून, दुसरीकडे मात्र गस्तीच्या नावाखाली वाहनांचा इंधन वैगरे खर्च होतच आहे. या प्रकाराची चौकशी होण्याची गरज आहे. रात्रपाळीचे पोलिस कर्मचारी नेमके करतात काय? की रात्र फक्त झोपा काढतात? अशा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरु असून, चोरींच्या घटना वाढल्या आहेत. या अगोदरच आठ दिवसआधी मेरा खुर्द येथे चोरांनी किराणा दुकान फोडून जबरी चोरी केली होती, त्याचा सुगावा अजून लागला नाही; तोच अंत्री खेडेकर येथील चारचाकी गाडीची चाकेच चोरट्यांनी लंपास केली आहे.