Breaking newsHead linesMaharashtra

भीषण अपघातात माजी मंत्री विनायक मेटे ठार!

मेटे यांच्या गाडीला अपघात करणारा ट्रक गुजरातमध्ये सापडला!
विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात करून पळून गेलेला ट्रक अखेर मुंबई पोलिसांनी शोधून काढला असून, हा ट्रक गुजरातमधील वापी येथे सापडला आहे. या ट्रकच्या चालकाला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिस गुजरातकडे रवाना झाले आहेत. टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजमधून संबंधित ट्रकची ओळख पटवण्यात आली होती. ट्रक चालकाचीही ओळख पटली असून, त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिस रवाना झाले आहेत. सद्या वापीमध्ये संबंधित ट्रक गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.


– कामोठेतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत प्राणज्योत मालवली

– बीड जिल्ह्यासह शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांवर शोककळा

– काल मंत्रिपदाची मागणी, आज पहाटे निधन; माझं लेकरू जाणूनबुजून मारलयं, आईचा गंभीर आरोप!


विनायक मेटेंचा अपघात की घातपात?
आज मराठा क्रांती मोर्चाची बैठक मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती, त्याच बैठकीला हजेरी लावण्याकरिता विनायक मेटे हे बीडहून मुंबईकडे येत होते. बीडमध्ये आज मोठा कार्यक्रम असतानाही समाजाच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी आपली उपस्थिती महत्त्वाची आहे, हे प्रमाण मानून त्यांनी बीडमधला कार्यक्रम सोडला आणि मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पण वाटेत त्यांना काळाने गाठलं. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर रायगडच्या हद्दीत त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर सुमारे तासभर त्यांना मदतच मिळाली नाही, असा गंभीर आरोप त्यांच्या वाहनाच्या चालकाने केला आहे. दरम्यान, हा अपघात नसून घातपात असल्याचा सूर आता उमटू लागला आहे. तर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वेगळी शक्यता वर्तवली आहे. विनायक मेटे यांचा रात्रभर प्रवास सुरू होता. सकाळी त्यांना मुंबईत यायचे होते. रात्रभर चालकाने गाडी चालवल्याने कदाचित त्याला डुलकी लागली असावी. त्यामुळे अपघात झाला असावा, असे अजित पवार म्हणाले. कुणाला या प्रकरणात घातपाताची शक्यता वाटत असेल तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही पवारांनी केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताची चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली आहे. विनायक मेटे यांचा मुलगा देखील यावेळी त्यांच्यासोबत गाडीत असल्याने त्यालाही किरकोळ जखम झाल्याची माहिती आहे. विनायक मेटे यांच्या झालेल्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे.

  • विनायक मेटे यांचा अपघात घातपात आहे का? अशी शंका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, विनायक मेटे यांचा अचानक अपघाती मृत्यू होणे हे दुर्दैवी आहे. त्यांच्या अचानक झालेल्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे. 
  • आज मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत सामील होण्यसाठी बीडहून विनायक मेटे मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. दरम्यान, मराठा समाजाच्या बैठकीची वेळ कुणी बदलली याची चौकशी करा, अशी मागणी मराठा समाजाचे नेते दिलीप पाटील यांनी केली आहे. 
  • मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आणि मराठा समन्वयक बाळासाहेब खैरे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या घडामोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “आम्ही माहिती घेतली त्यानुसार अपघात झाला तेव्हा २ तास तिथे रुग्णवाहिका आली नाही. कोणतीही सुविधा मिळाली नाही. आजूबाजूला मदतीसाठी कुणी थांबलं नाही. येण्या-जाण्यातही बराच वेळ गेला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. हा अपघात होता की घातपात होता? याची आम्हाला शंका आहे. हे सरकारनं तात्काळ जाहीर करावं. मराठा आरक्षणासाठी अजून सरकार किती बळी घेणार आहे? हा आमचा सरकारला सवाल आहे”, असं ते म्हणाले.
  • विनायक मेटेंच्या निधनानंतर त्यांचा प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेचा शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवसंग्राम पक्षाला मंत्रिमंडळात स्थान द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यांनी काल याबाबतची मागणी केल्यानंतर आज पहाटे त्यांचे अपघाती निधन झाले आहे. तर त्यांच्या आईने मेटे यांच्या निधनानंतर भावनिक उद्गगार काढत, माझं लेकरु मरायसारखा नव्हता, जाणून बुझून माझं लेकरु मारलं असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
  • विनायक मेटे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या शेवटच्या प्रतिक्रियेत शिवसंग्रामला मंत्रिपद देण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिवसंग्रामला २०१४ ते २०१९ काळात मंत्रिपद मिळाले नाही. भाजपने शिवसंग्राम सोडून सर्व मित्रपक्षांना मंत्रिपदाची संधी दिली. यावेळी तरी ती संधी आम्हाला द्यावी, अशी मागणी मेटेंनी केली होती. पण त्यांच्या शिवसंग्रामला मंत्रिपद मिळवून देण्याचे स्वप्न अखेर अधुरच राहीले. कारण मेटेंनी त्याबाबतची मागणी केल्यानंतर आज दुर्देवाने त्यांचे अपघाती निधन झाले. दुसरीकडे, मेटे यांचा अपघात हा ठरवून केला असल्याची टीका त्यांच्या आईने केली असून, त्यांच्या निधनानंतर त्यांना जोरदार मानसिक धक्का बसला आहे. तर विनायक मेटे यांच्या पत्नीलाही मानसिक धक्का बसल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल केले गेले आहे.

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन उभे करणारे, तीनवेळा आमदार आणि मंत्री राहिलेले शिवसंग्राम या संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांचे आज सकाळी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील भीषण अपघातात दुर्देवी निधन झाले.  हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला.  पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.  गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे.  अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही.  अतिशय गंभीर अवस्थेत त्यांना कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेने बीड जिल्ह्यासह त्यांच्या शिवसंग्राम संघटना व पक्षाच्या कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली होती. अपघात इतका भीषण होता, की त्यांची फोर्ड Endeavour (MH 01 DP 6364) ही एसयूव्ही गाडी अक्षरशः चक्काचूर झाली होती. दरम्यान, मेटे यांच्या पार्थिवावर बीड येथील कॅनॉल रोड, सिद्धिविनायक पार्कमध्ये सोमवारी (दि.१५) दुपारी ३.३० वाजता अंत्यसंस्कार होईल, अशी माहिती शिवसंग्राम कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

अपघाताचे नेमके कारण कळत नसले तरी, मेटे हे गंभीर जखमी असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या डोक्याला मार लागलेला होता व मोठ्या प्रमाणात रक्तास्त्रावदेखील झाला होता. माजी आमदार राहिलेले विनायक मेटे हे बीडवरून आज सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मुंबईला येत हाेते.  परंतु, पनवेलनजीकच्या पहिल्याच बोगद्यात अपघाताचा हा भीषण प्रसंग गुदरला. महामार्ग पोलिसांनी त्यांना तातडीने एमजीएममध्ये दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. मेटे यांचा शिवसंग्राम हा पक्ष भाजपचा सहयोगी पक्ष होता. या घटनेची माहिती कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या भावंडांनीही तातडीने संपर्क साधत माहिती घेतली. मेटे हे भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. २०१४ मध्ये त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली होती. त्यापूर्वी ते शरद पवार यांच्यासोबत होते व राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार राहिले होते. मराठा समाजासाठी त्यांनी आपले सर्वोच्च योगदान दिले. मराठा आरक्षणासाठी ते व त्यांचा पक्ष आक्रमकपणे रस्त्यावर उतरला होता. त्यामुळे मेटे यांच्या निधनाने मराठा समाजाची मोठी हानी झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक मेटे हे त्यांच्या फोर्ड Endeavour MH 01 DP 6364 या गाडीने मुंबईकडे निघाले होते. मुंबईकडे दुसऱ्या लेनने जात असताना कार चालक यांचा त्यांच्या गाडीवरील त्यांचा ताबा सुटून पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला ठोकर मारली.  यामुळे हा अपघात झाला आहे.  या अपघातात विनायक मेटे हे अत्यंत गंभीर जखमी झाले.  त्यांना आयआरबी ॲम्बुलन्सने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारासाठी दाखल केले.  यावेळी दवाखान्यात डॉ.धर्मांग यांनी मेटे यांना तपासून मयत घोषित केले.  मेटे यांचे बाॅडीगार्ड पोलिस हवालदार राम ढोबळे हे कारमध्ये अडकले होते.  हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले की, पहाटे पाच वाजता त्यांचा अपघात झाला.  मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.  मेंदूला मार लागल्याने जागेवरच मेटे यांचा मृत्यू झाला.  त्यांना दवाखान्यात दाखल करताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं.

दरम्यान, मेटे यांच्या पार्थिवावर बीड येथील कॅनॉल रोड, सिद्धिविनायक पार्कमध्ये सोमवारी (दि.१५) दुपारी ३.३० वाजता अंत्यसंस्कार होईल, अशी माहिती शिवसंग्राम कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मेटे यांचे पार्थिव आज मुंबईहून बीड येथे आणण्यात आले आहे. त्यानंतर शिवसंग्राम भवन येथे ते अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. सकाळी साडेदहा वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होईल, अशी माहितीही निकटवर्तीयांनी दिली आहे.


विनायक मेटे यांचा थोडक्यात परिचय
माजी मंत्री, माजी आ. विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलने केली. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्षदेखील होते. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी असलेले मेटे हे सर्वप्रथम शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात आमदार झाले. त्यानंतर सलग पाच टर्म ते विधानपरिषद सदस्य राहिले आहे. आतादेखील त्यांची शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता होती.


एक तासभर विनायक मेटे जखमी अवस्थेत गाडीच हाेते, तातडीने मदत मिळाली नाही!

विनायक मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम हेदेखील यावेळी त्यांच्यासोबत होते.  कदम यांच्याशी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने  संवाद साधला असता, त्यांनी सांगितले, की बीडकडून आम्ही मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला.  आम्हाला एका ट्रकने कट मारला. आम्हाला अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही. 100 नंबरला आम्ही फोन केला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही.  मदतीसाठी मी प्रत्येकाला विनवणी करत होतो. मात्र कुणीही गाडी थांबवली नाही.  मी रोडवर झोपलो होतो, आम्ही गाड्यांना हात करत होतो, मग एका गाडीवाल्याने गाडी थांबवली, आणि आम्हाला मदत केली.  एका तासानंतर तेथे रुग्णवाहिका आली.  अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो तर तेव्हा ते माझ्याशी संवाद करत होते,  असेही एकनाथ कदम यांनी सांगितले.  एकनाथ कदम हे अपघातावेळी मेटे यांच्या सोबत होते. मदतीसाठी एक तास कुणीही आले नसल्याचे कदम यांनी सांगितले.


पोलीस काय म्हणाले?
दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या पंचनाम्यात अपघाताचे नेमके कारण दिले आहे. मेटे हे मुंबईकडे दुसर्‍या लेनने जात होते. कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटून पुढे जाणार्‍या अज्ञात वाहनाला ठोकर मारून अपघात झाला, असे पोलिसांनी म्हटले आहे.

विनायक मेटे हे मागच्या सीटवर डाव्या बाजूला बसले होते. पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला त्यांचा बॉडीगार्ड होता. मेटे यांची गाडी हायवेच्या मधल्या लेनमध्ये होती. 10 चाकी ट्रक हा तिसऱ्या लेनला चालत होता. या ट्रकचालकाने तिसऱ्या लेनमधून मधल्या लेनमध्ये येणाचा प्रयत्न केला. यावेळी मेटे यांची गाडी वेगात होती. अचानक ट्रक मधे आल्यानं वेगानं मेटे यांची गाडी ट्रकला धडकली. चालकाला गाडी कंट्रोल करणं जमलं नाही. मेटे यांची गाडी डाव्या बाजूने ट्रकच्या उजव्या बाजूला धडकली. मेटे यावेळी झोपेत होते, त्यामुळं त्यांना काही कळायच्या आत वेगाने धडक बसल्यानं डोक्याला मार बसला. यात मेटे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बराच वेळ मेटे यांना मदत मिळाली नाही. या अपघातानंतर ट्रकचालक हा फरार झाला आहे. पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यमातून याची पाहणी करत आहेत. चौकशीसाठी 8 पथकं नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती आहे. 


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवारांकडून मेटे कुटुंबीयांचे सांत्वन

शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या परिवाराची भेट घेत सांत्वन केले. या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या मृत्यूनंतर राज्याच्या राजकारणाची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. शरद पवार हेही त्यांच्या कुटुंबाच्या भेटीसाठी पोहोचले होते. त्यांनी यावेळी मेटेंविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. छत्रपती संभाजीराजे, छत्रपती उदयनराजे भाेसले यांनीही तीव्र शोक व्यक्त केला आहे. मराठा समाजाचा आवाज गेला, निडरपणे लढाई लढणारा नेता हरपला, असे संभाजीराजे म्हणाले.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!