अतिवृष्टी, पूरग्रस्तांच्या नुकसानीचा विमा कंपनीकडून सर्व्हे सुरू!
– शेतकर्यांकडून शेतीपिकांच्या नुकसानीची माहिती अपलोड; कंपनीकडून सर्वेक्षण सुरू!
चिखली (एकनाथ माळेकर) – तालुक्यातील शेळगाव आटोळ व मेरा खुर्द महसूल मंडळात ४ ऑगस्टरोजी ढगफुटीसदृश पाऊस झाला. तसेच, त्यानंतरही सातत्याने संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतीपिकांचे ७० ते ८० टक्के नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतीपिके हातातून गेली आहेत. शेतकर्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाल्याने या नुकसानीचा पीकविमा शेतकर्यांना मिळणे गरजेचे आहे. त्यानुसार, शेतकर्यांनी आपल्या शेतातील नुकसानीची माहिती फोटोसह कंपनीकडे अपलोडही केली होती. परंतु, कंपनीचे अधिकारी सर्वेक्षणाला येत नव्हते. ही बाब मिसाळवाडी, पिंपळवाडी येथील शेतकर्यांनी ब्रेकिंग महाराष्ट्राच्या कानावर घातली होती. याबाबत कंपनीकडे पाठपुरावा करण्यात आला असता, भारतीय कृषी विमा कंपनीचे चिखली तालुकाधिकारी सूर्यकांत चिंचोले यांनी तातडीने पंचनामे सुरु केले गेले आहेत, अशी माहिती दिली आहे. त्यानुसार, कंपनीचे कर्मचारी शेतीपिकाच्या नुकसानीच्या प्राप्त माहितीनुसार, सर्वेक्षण करत आहेत.
चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ, मिसाळवाडी, भरोसा, देऊळगाव घुबे, पिंपळवाडी या गाव परिसरात मुसळधार स्वरुपाचा पाऊस कोसळला. दिनांक ४ ऑगस्टरोजी तर अक्षरशः ढगफुटी झाली. या ढगफुटीने मिसाळवाडी धरण भरून सांडव्यावरून पाणी वाहिले व हे पाणी नदीकाठच्या शेतांत शिरून शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले. जोरदार पाऊस म्हणजे अतिवृष्टी व नदीच्या पुरामुळे हातातोंडाशी आलेला शेतीपिकांचा घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे. राज्य सरकारने अतिशय तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. ती कधी मिळेल, याची काही खात्री नाही. परंतु, ज्या शेतकर्यांनी आपला शेतीपिकांचा विमा उतरविला होता, त्या शेतकर्यांनी विमा कंपनीकडे धाव घेऊन चोवीस तासांच्याआत फोटोंसह पीकनुकसानीची माहिती अपलोड केली.
चिखली तालुका हा भारतीय कृषी विमा कंपनीकडे आहे. त्यानुसार, या कंपनीच्या कर्मचार्यांनी तातडीने सर्वेक्षण करणे गरजेचे होते. ढगफुटी व नुकसान होऊन दोन आठवडे होत आले तरी, कर्मचारी शेताकडे फिरकले नसल्याने, त्यातील मिसाळवाडी व पिंपळवाडी येथील शेतकर्यांनी ही बाब ब्रेकिंग महाराष्ट्रच्या कानावर घातली होती. याबाबत चिखली तालुका प्रतिनिधी व वरिष्ठ पत्रकार एकनाथ माळेकर यांनी तातडीने कंपनीच्या अधिकार्यांशी संपर्क साधून, सर्वेक्षण कधी सुरु होणार, याची विचारणा केली. तसेच, बातम्यांच्या माध्यमातूनही हा प्रश्न त्यांच्याकडे मांडला. त्यामुळे कंपनीची यंत्रणा तातडीने हलली व अधिकारी, कर्मचारी यांनी शेतीपिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरु केले आहे. नुकसान झालेल्या व आमच्याकडे माहिती अपलोड केलेल्या प्रत्येक शेतकर्यांच्या शेतीपिकांचे सर्वेक्षण केले जाईल व नुकसान भरपाईबाबत दावे कंपनीकडे सादर केले जाईल, अशी माहिती भारतीय कृषी विमा कंपनीचे चिखली तालुकाधिकारी सूर्यकांत चिंचोले यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना दिली आहे. कंपनीच्या या तातडीच्या कार्यवाहीने शेतकरी समाधान व्यक्त करत असून, जास्तीत जास्त शेतकर्यांना आता पीक नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
मेरा बुद्रूक व शेळगाव आटोळ महसूल मंडळात, विशेष करून शेळगाव आटोळ, मिसाळवाडी, पिंपळवाडी, भरोसा या भागात नदीचा पूर आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. आम्ही राज्य सरकारकडे एकरी २५ हजार रुपये नुकसान भरपाईची मागणी केली आहे. परंतु, सरकारने अतिशय तुटपुंजी मदत देण्याचे जाहीर केले आहे. त्यावर आमचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सरकारशी चर्चा करत आहेत. राज्य सरकारची मदत मिळेल तेव्हा मिळेल. परंतु, भारतीय कृषी विमा कंपनीचा विमा या भागातील शेतकर्यांनी उतरविला होता. या विमा कंपनीने नियमाप्रमाणे शेतकर्यांना नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे. तेव्हा, कंपनीने तातडीने शेतीपिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून सर्व विमाधारक शेतकर्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आम्ही सर्व गावे तीव्र आंदोलन करू.
– डॉ. विकास मिसाळ, तालुका उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चिखली
– बाळासाहेब मिसाळ पाटील, सरपंच, मिसाळवाडी, ता. चिखली