मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाने ओबीसी समाजावर लक्ष केंद्रीत केले असून, माजी मंत्री तथा विधानपरिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रुपाने ओबीसी चेहरा प्रदेशाध्यक्षपदी दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी तर राज्य मंत्रिमंडळात वर्णी न लागलेले आ. आशीष शेलार यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीचे पत्र आज जारी झाले आहे.
सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदाद पाटील यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद रिक्त झाले होते. त्याजागी आता बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आशीष शेलार यांच्याकडे मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ही महत्त्वपूर्ण जबाबादारी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. शेलार हे सलग दोन टर्म आमदार असून, त्यांनी याआधी सात वर्षे मुंबई भाजपचे अध्यक्षपद भूषवले आहे. आता त्यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागेल, असे बोलले जात होते. परंतु, त्यांची ती संधी हुकली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तर आमदार आशीष शेलार यांना मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्यानंतर, या दोन्ही नियुत्तäया तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्याचे पत्रात नमूद केले आहे. भाजप राज्यात पुन्हा सत्तेवर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत. तसेच, गेल्या १० वर्षांत भाजपचा प्रदेशाध्यक्ष ओबीसीमधून झालेला नाही. सुधीर मुनगंटीवार यांची मुदत २०१३ मध्ये संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांच्यानंतर रावसाहेब दानवे आणि त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे सूत्रे गेली. भाजपचा ओबीसी हा मोठा पाठीराखा आहे. मात्र प्रमुख पदांवर त्यांच्यातील नेते नाहीत, असा संदेश जाऊ नये म्हणून बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे.
प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, येणार्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ४५ प्लस तर विधानसभेत २०० प्लस जागा मिळाव्यात, यासाठी सर्व प्रयत्न केले जातील.