चिखली (एकनाथ माळेकर) – चिखली कृषी विभागाच्यावतीने ‘रानभाजी महोत्सव’ साजरा करून, चिखली तालुकावासीयांना अनोख्या उपक्रमाची मेजवाणी दिली आहे. १२ ऑगस्टरोजी आदिवासी दिनाचे औचित्य साधून हा महोत्सव साजरा करण्यात आला. तहसीलदारांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या महोत्सवात तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी रानभाज्यांबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन उपस्थित शेतकरी, चिखलीकर व अधिकारी, कर्मचारी यांना केले. या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
आदिवासी दिनाचे औचित्य साधून चिखली तालुका कृषी विभाग यांच्यावतीने रानभाजी महोत्सवाच्या आयोजन करण्यात आले होते. आपल्या रोजच्या आहारात रानभाजीचे महत्व व नवीन पिढीला त्याची ओळख होण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरला. विशेष करून पावसाळ्याच्या दिवसांत येणार्या विविध रानभाज्या यावेळी पहायला मिळाल्यात.
चिखली तालुका कृषी कार्यालयमध्ये स्टॉल लावून रानभाज्यांची माहिती देण्यात आली. सदर रानभाजी महोत्सवाचे उदघाटन तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे यांच्याहस्ते झाले. रानात येणार्या विविध रानभाज्या, त्यांचे पौष्टिकत्व, त्यांचे मानवी आरोग्यासाठीचे महत्व, याबाबत तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी प्रास्ताविकामध्ये उपस्थितांना माहिती दिली. या कार्यक्रमासाठी शेतकरी बांधव व कृषी विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित शेतकरी, चिखलीकर व विविध मान्यवरांचे आभार कृषी सहाय्यक मंगेश भुसारी यांनी मानले.