चिखली (एकनाथ माळेकर) – तालुक्यातील मिसाळवाडी या गावाच्या स्मशानभूमीचे काम अत्यंत निकृष्टदर्जाचे झाले असून, संततधार पावसाने व ४ तारखेला झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने ही स्मशानभूमीच वाहून गेली आहे. या स्मशानभूमीच्या भिंती उन्मळून पडल्या असून, पाणी साचले होते. त्यामुळे भरपावसाळ्यात कुणाचे निधन झाले तर अंत्यविधी करायचा कुठे?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिसाळवाडी गावातील स्मशानभूमीच्या वॉल कम्पाउंडचे काम मार्च-एप्रिल महिन्यात झाले होते. परंतु, हे काम करताना त्याचा दर्जा सांभाळला गेला नाही. वॉल कम्पाउंडच्या भिंती खोल जमिनीतून व पक्के बांधकाम, आरसीसी पोलसह करायला पाहिजे होत्या. परंतु, नंदकिशोर राऊत नावाच्या ठेकेदाराने अत्यंत तकलादू व थातूर मातूर काम करून आपली बिले काढून घेतली आहेत. त्यामुळे आता जेव्हा जोराचा पाऊस झाला तेव्हा या भिंती पडल्या असून, स्मशानभूमीत पाणीच पाणी होऊन, स्मशानभूमी वाहून गेली आहे.
संबंधित ठेकेदाराने अत्यंत निकृष्टदर्जाचे काम केल्याने ग्रामपंचायत व पंचायत समितीने या ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, तसेच त्याच्याकडून पैसे वसूल करावेत किंवा पुन्हा काम करून घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. याबाबत आपण गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहोत, अशी माहिती मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील यांनी दिली आहे.
Leave a Reply