BuldanaVidharbha

‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या विदर्भ अध्यक्षपदी अनिल म्हस्के

बुलडाणा (ब्रेकिंग महाराष्ट्र) : महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणजे ‘व्हाईस ऑफ मीडिया’ राज्यात पत्रकार आणि पत्रकारीतेच्या सर्वांगिन विकासासाठी आणि हितासाठी अग्रगण्य असणाऱ्या या संघटनेच्या विदर्भ अध्यक्षपदी दै. ‘पुण्य नगरी’चे अकोला आवृत्ती प्रमुख अनिल म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘व्हाईस ऑफ मीडिया’ ही ५० ज्येष्ठ संपादकांनी एकत्र येऊन पत्रकारीता आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी निर्माण केलेली संघटना आहे. देशातील १७ राज्यांमध्ये ही संघटना कार्यरत आहे. कोरोनाच्या संकटाकाळात १३६ पत्रकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ‘व्हाईस ऑफ मीडिया’ने या १३६ पत्रकारांच्या १५० पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करुन त्यांना मोठा आधार देण्याचे काम केले. पत्रकारांची कल्याणकारी संघटना म्हणून ही संघटना देशात कार्यरत असून कोणतेही राजकारण न करता केवळ पत्रकारीता आणि पत्रकारांना सक्षम करण्याचे काम ही संघटना करीत आहे. पत्रकारांना त्यांची स्वत:ची घरे उपलब्ध करुन देणे, पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, आजारपण, अपघात किंवा इतर सकटकाळी पत्रकारांना आधार देण्याचे कार्य ही संघटना करीत आहे. या संघटनेच्या विदर्भ अध्यक्षपदी दै. ‘पुण्य नगरी’चे अकोला आवृत्ती प्रमुख अनिल म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘व्हाईस ऑफ मीडिया’चे संस्थापक अध्यक्ष तथा संपादक संदीप काळे यांनी मुंबई येथील कार्यालयात अनिल म्हस्के यांना नियुक्तीपत्र सुपूर्द करुन त्यांच्याकडे संपूर्ण विदर्भाची जबाबदारी सोपविली. बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली असून त्यांच्या कार्यकाळात सुसज्ज असे जिल्हा पत्रकार भवन पत्रकारांसाठी खुले झाले. सध्या जिल्हा पत्रकार भवन समितीचे ते अध्यक्ष आहेत. आता पत्रकारांची कल्याणकारी संघटना असलेल्या ‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या विदर्भ अध्यक्षपदाची धूरा त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

जिल्हा, तालुकास्तरावर लवकरच नियुक्त्या
संपूर्ण विदर्भाचा दौरा करुन विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ‘व्हाईस ऑफ मीडिया’चे पदाधिकारी नियुक्त केले जाणार आहे. जिल्हा तसेच तालुका स्तरावर ११ सदस्यांची समिती तयार करुन पदाधिकारी निवडले जाणार असून शहरी व ग्रामीण अशा सर्वच पत्रकारांना यामध्ये सहभागी करुन घेणार असल्याची माहिती नवनिर्वाचीत विदर्भअध्यक्ष अनिल म्हस्के यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!