– रक्ताचे पाणी करून पुन्हा एकदा शिवसेना वाढवू : आशीष रहाटे
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – धर्मवीर स्व. दिलीपराव रहाटे नावाचे वादळ पुन्हा एकदा जिल्ह्यात घोंगावू लागले असून, बुलडाणा जिल्ह्यातून शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपली असल्याची वल्गना करणार्यांना या वादळाने जोरदार तडाखे देण्यास सुरुवात केली आहे. धर्मवीरांचे सुपुत्र आशीष रहाटे यांनी आज मेहकर येथे विक्रमी गर्दीची सभा घेऊन चक्क ‘प्रताप’गडालाच हादरे दिले. या सभेला तरुण शिवसैनिकांची उत्स्फुर्त गर्दी पाहाता, आशीष रहाटे यांचे नेतृत्व सर्वमान्य झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘काय ती गर्दी, काय तो माहोल, एकदम ओक्के’, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया तरुण शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. बंडखोरांच्या उरात धडकी भरवणारी ही सभा ठरली. रक्ताचे पाणी करून वडिलांप्रमाणेच आपण पुन्हा एकदा शिवसेनेची बांधणी करू, अशी भीष्मप्रतिज्ञा आशीष रहाटे यांनी या सभेतून केली. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, सहसंपर्कप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रा. नरेंद्र खेडेकर, रमेशअण्णा मुळे यांच्यासह राजकीय, सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
धर्मवीरपुत्र आशीष रहाटे यांनी मेहकर मतदारसंघात संवाद यात्रा काढून शिवसेनेला नवसंजीवनी दिली, तसेच कट्टर शिवसैनिक आजही बाळासाहेब ठाकरे यांच्याच शिवसेनेसोबत असून, ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आपला नेते मानत असल्याचेही यानिमित्ताने अधोरेखीत झाले आहेत. जिल्हा परिषद सदस्य आशीष रहाटे यांनी बंडखोरांसोबत न जाता, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा राजकीय निर्णय घेतला, आणि मेहकर-लोणारसह जिल्ह्यातील राजकीय वातावरण एकदम बदलून गेले आहे. या नव्या उमेदीच्या नेतृत्वाने चक्क ‘प्रताप’गडासमोर आव्हान उभे केले आहे.
खांद्यावर भगवा ध्वज घेऊन आशीष रहाटे यांनी मेहकर-लोणार मतदारसंघात संवादयात्रा काढली. या यात्रेला जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. उकळी-सुकळी, घाटबोरी, लोणी लव्हाळा, गजरखेड, कल्याणा, उसरण, वडगावमाळी, शेंदला या गावांत त्यांच्या जोरदार सभा झाल्या, व त्याला तरुणांचा मोठा प्रतिसाद लाभला.
आज हे भगवे वादळ मेहकरात येवून धडकले. त्यांचे भावनिक आवाहन तरुण शिवसैनिकांच्या भावनांना हात घालत आहे. ३५ वर्षात तुम्हाला एकदाही उद्धव ठाकरे भेटले नाहीत का?, असा सवाल करत, धर्मवीरांचा पुत्र म्हणून आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेणार आहोत. पुन्हा खेड्यापाड्यांत जावून शिवसेनेची बांधणी करणार आहोत, असेही आशीष रहाटे यांनी नीक्षून सांगितले. शेवटच्या श्वासापर्यंत आपण शिवसेनेसाठी काम करत राहू, त्यासाठी रक्ताचे पाणी करू, असेही ते म्हणाले. याप्रसंगी काँग्रेसमधील अनेकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. या सभेला ३० हजारांपेक्षा जास्त तरुणांनी आपली उपस्थिती लावून मेहकर-लोणार मतदारसंघातील तरुणवर्ग आशीष रहाटे यांच्यासोबत असल्याचे दाखवून दिले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात मेहकर येथे निष्ठावंत शिवसैनिकांचा हा मेळावा सहसंपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली तर शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या प्रमुख उपस्थितीत धर्मवीर स्व. दिलीपराव रहाटे यांचे सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य आशीष रहाटे यांनी वृंदावन लॉन आयोजित केला होता. मेळाव्याला प्रा. खेडेकर, जालिंदर बुधवत, आशीष रहाटे यांनी मार्गदर्शन केले. मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघातील या मेळाव्याला हजारो निष्ठावंत शिवसैनिकांनी लावलेली हजेरी म्हणजेच हिंदुहृदसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रती असलेले प्रेम व समर्थन दिसून आल्याचे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी गणेश बोचरे, नारायण बळी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मेळाव्याला माजी पंचायत समिती सभापती निंबाजी पांडव, चिखली शहर प्रमुख श्रीराम झोरे, किशोर गारोळे, संदीप मापारी, देवानंद निकम, रमेश अण्णा मुळे, माजी नगरसेवक असलम खान, हेमराज शर्मा, रमेश देशमुख, किसन पाटील, बाजड मामा यांच्यासह मेहकर तालुक्यातील व मतदार संघातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.