– जद (यू), राजद व काँग्रेस मिळून नव्याने सरकार बनविणार
– भाजपच्या महाराष्ट्रातील आनंदावर बिहारमध्ये विरजण
पाटणा – महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. त्यानंतर बरेच प्रयत्न केल्यानंतर शिंदे गट फुटला आणि राज्यात भाजपला सत्ता मिळू शकली. त्यातच, आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. महाराष्ट्रातील घडामोडींचा आनंद साजरा करीत असतानाच, भाजपला मोठा धक्का बसला आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा जेडीयू-भाजप युती तुटली असून, नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर, भाजपची साथ सोडली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपपासून अधिकृतपणे फारकत घेत, आज दुपारी राज्यपाल फग्गु चौहान यांची भेट घेवून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत नव्या आघाडी सरकारच्या स्थापनेचा दावा केला आहे. तसेच, आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत, नव्याने सरकार स्थापनेचा दावाही दाखल केला आहे. त्यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्रात आपल्याकडे १६० आमदारांचा पाठिंबा असल्याचे नमूद केले आहे. या घटनेने भाजपला जबरदस्त हादरा बसला असून, पाच वर्षानंतर बिहारच्या राजकारणात चाचा-भतीजे (तेजस्वी यादव-नितीशकुमार) यांचे सरकार येणार आहे.
जनता दल (संयुक्त) व भाजप यांच्यातील आघाडी संपुष्टात आल्याची घोषणा मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजभवनावर जाऊन केली. आमच्या आमदार व खासदारांनी एकमुखाने राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्त करत, नव्याने सरकार स्थापन करण्याचा दावाही दाखल केला. त्यानंतर ते थेट राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या राबडीदेवी व तेजस्वी यादव यांच्या घरी गेले व त्यांच्यासोबत सरकार स्थापनेबाबत चर्चा केली. या घडामोडीने बिहारच्या राजकारणात चांगली खळबळ उडाली. नितीशकुमार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनादेखील जुमानले नाही. त्यामुळे जीतन राम मांझी यांच्या पक्षानेदेखील नितीशकुमार यांना आपला पाठिंबा दर्शविला. त्यांचे चार आमदार आहेत, त्यामुळे नितीशकुमार यांचे संख्याबळ १६४ इतके झाले आहे.
दुसरीकडे, नितीशकुमार हेच महाआघाडीचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा काँग्रेसने केली आहे. तर, तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील महाआघाडीकडे जनता दल (संयुक्त) ४५, राष्ट्रीय जनता दल ७९, काँग्रेस १९, एचएएम ०४, डावे व इतर असे १७ मिळून १६४ आमदारांचे संख्याबळ आहे. नितीशकुमार यांचेही उद्धव ठाकरे करण्याचे षडयंत्र भाजपने रचले होते. त्यासाठी त्यांच्यातील एकाला एकनाथ शिंदे केले जाणार होते. त्याची कुणकुण लागताच, सावध झालेल्या नितीशकुमार यांनी भाजपची तडकाफडकी साथ सोडत, आपल्या जुन्या मित्रांसोबत सरकार स्थापन करणे पसंत केले आहे.
संपूर्ण देश भाजपमय करण्याचा प्रयत्न करणारे अमित शाह यांनी मात्र आपली सूत्र हलवण्यास सुरुवात केली आहे. वरिष्ठ राजकीय पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना फोन केला होता. सरकार वाचवण्यासाठी अमित शाहांकडून हा शेवटचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. मात्र, नितीशकुमार यांनी काहीही प्रतिसाद न देता, जुन्या मित्रांसोबत सरकार स्थापन करण्यास प्राधान्य दिले आहे. आमदार फुटण्याची शक्यता पाहाता, नितीशकुमारांनी सर्व आमदारांवर कडक नजर ठेवली आहे.