– काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे यांची माहिती
चिखली (एकनाथ माळेकर) – भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन अर्थात अमृतमहोत्सव १५ ऑगस्टरोजी साजरा होत आहे. संपूर्ण देश अतिशय उत्साहात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. त्याअनुषंगाने मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्यावतीने ‘आझादी गौरव यात्रा’ निघणार असल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना दिली. त्यासाठी गौरव रथ तयार करण्यात आला असून, पूर्ण मतदारसंघ पिंजून काढून राष्ट्राला नमन करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
या यात्रेचा शुभारंभ ९ ऑगस्टरोजी सकाळी ८ वाजता सिंदखेडराजा येथील राजवाड्यासमोर होणार आहे. आपल्या देशासाठी ज्या महापुरुषांनी प्राणाची आहुती दिली, अनेक प्रकारचा त्याग केला, त्यासर्वांच्याच स्मृतींना उजाळा देत, त्यांच्या नावाचा जयघोष करत, रथावर देशभक्ती पर गाणे वाजतगाजत ही यात्रा निघणार आहे. त्यासाठी सुंदर असा ‘गौरवरथ’ तयार करण्यात आला आहे. सिंदखेडराजाहून निघणारी यात्रा संपूर्ण मतदारसंघातून फिरत १४ ऑगस्टरोजी बालाजीनगरी देऊळगांवराजात पोहोचेल व व तिथेच यात्रेचा समारोप होईल. यात्रेमधे काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, महिला काँग्रेस, शासकीय समित्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते राहणार आहेत. तरी सर्वसामान्य नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा संकोच न बाळगता, स्वातंत्र्याच्या या उत्सवामध्ये सामिल होऊन आझादी गौरव यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहनही शिवदार रिंढे यांनी केले आहे.
Leave a Reply