मुंबई (सांस्कृतिक प्रतिनिधी) : मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे तीन दशकांहून अधिक काळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाले आहे. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी वयाच्या ६५ व्यावर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याची माहिती आहे. त्यांच्या मृत्यूने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठी नाटके, सिनेमे आणि मालिकांमध्येही प्रदीप पटवर्धन यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.
‘मोरूची मावशी’ या नाटकातील त्यांचे काम आजही स्मरणात राहील. या नाटकातील ‘भैया पाटील’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष आवडीची. भरत जाधव, विजय चव्हाण, विजय पाटकर यांसारख्या दिग्गज कलाकारांसह त्यांनी रंगभूमी गाजवली आहे. ‘नवरा माझा नवसाचा’, ‘लावू का लाथ’ या सिनेमातील त्यांच्या रंजक भूमिकांनी प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवले होते. एक फुल चार हाफ (१९९१), चष्मे बहाद्दर, गोळा बेरीज, डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, एक शोध, पोलीस लाईन, व टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, परिस, थँक यू विठ्ठला या सिनेमातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
मराठी सिनेसृष्टीत मानाने आणि अभिमानाने मिरवावे असे व्यक्तीमत्व. त्याचें नाव सिनेसृष्टीत आदराने घेतले जाते. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे, अश्या भावना व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्या मोरूची मावशी या नाटकाने तर मराठी सिनेरसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. दिलखुलास व्यक्तिमत्व, प्रभावी अभिनय, आणि लक्षवेधी संवादफेक यामुळे कायम प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या प्रदीप यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वात मोकळी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे अनेक सिनेमे गाजले. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, नवरा माझा नवसाचा या सिनेमांनी तर लोकप्रियतेचे शिखर गाठले. मोरूची मावशी नाटक नाट्यरसिकांना खेचून तिकीटबारीवर खेचून आणले. तर हास्य जत्रेतून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवले. अश्या अवलियाचे अकाली जाणे अनेकांसाठी धक्कादायक ठरले आहे.
- प्रदीप पवर्धन यांचे गाजलेले सिनेमे
एक फुल चार हाफ
डान्सपार्टी
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
गोळा बेरीज
बॉम्बे वेल्वेट
पोलीस लाईन
१२३४
एक शोध
थॅक्यू विठ्ठला
चिरनेर
——————-