धान्याच्या बदल्यात मिळते दारू!; अंढेरा पोलिस ठाणेअंतर्गतचा धक्कादायक प्रकार?
– गुंजाळ गावाच्या महिला पोलिस ठाण्यावर धडकल्या!
चिखली (एकनाथ माळेकर) – महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र झाल्याचे धक्कादायक वास्तव चव्हाट्यावर आले आहे. चिखली तालुक्यातील व अंढेरा पोलिस ठाणे हद्दीत येणार्या मेरा बीटअंतर्गतच्या गावांमध्ये चक्क धान्याच्या बदल्यात अवैध व गावठी दारू मिळू लागली आहे. या धक्कादायक प्रकारात गोरगरीब व खेडूत लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. संबंधित बीट जमादार व पोलिस अधिकारी हा अवैध प्रकार का राेखत नाहीत? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या दारूविक्रेत्यांना बीट जमादार पाठीशी घालत असल्याचा आराेप करत, गुंजाळ गावाच्या महिलांनी अंढेरा पोलिस ठाण्यावर धडक देत, पोलिस प्रशासनाला जाब विचारला हाेता.
अवैध दारूविक्री, गावठी दारूचा सुटलेला महापूर आणि गावांत माजलेले अवैध धंदे यामुळे वैतागलेल्या गुंजाळ गावाचे पोलीस पाटील गजानन केदार, गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने अंढेरा पोलिस ठाण्यावर धडकले, व गावातील अवैद्य देशी दारू बंद करण्याची मागणी ठाणेदार हिवरकर यांच्याकडे केली. गुंजाळ गाव मेरा बुद्रुक पासून हाकेच्या अंतरावर आहे. गावामध्ये खुलेआम देशी दारू विकल्या जात आहे. गुंजाळ गावातील सार्वजनिक ठिकाणे जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व महादेव मंदिर यांच्या शेजारी राहणारे व्यक्ती हा देशी दारूचा धंदा करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे गावातील तरुणपिढी व्यसनाकडे वळत असून, व्यसनामुळे गावात दररोज भांडणतंटे सुरु आहेत.
गावातील महिलांना गावात फिरणेसुद्धा मुश्किल झाले आहे. दारू विकणारे पोलिसांच्या अर्थपूर्ण सहकार्यामुळे गावातील लोकांवर दादागिरीची भाषा वापरत आहेत. विशेष म्हणजे, एखाद्या दारूड्याकडे पैसे नसेल तर हे दारूविक्री करणारे संबंधित दारूड्याकडून गहू, ज्वारी, बाजरी, दाळदाणा घेऊनसुद्धा दारूची बाटली त्याला देत आहेत. दरम्यान, पोलिसांनी या गावात जाऊन दारूविक्रेत्यांचा शोध घेतला असता, त्यांना ते आढळून आले नाही. त्यामुळे या गावात दारूविक्री होत नाही, असा कयास पुन्हा पोलिसांनी बांधला आहे.
प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना या गावातील ग्रामस्थ व महिलांनी सांगितले, की आम्ही अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार श्री हिवरकर साहेब यांना याबाबत फोन केला असता, ते फोन उचलत नाही. आम्ही यापूर्वीही अंढेरा पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले होते. तरीही गावात अवैध दारूविक्री खुलेआम सुरु असताना पोलिस कसे काय दुर्लक्ष करत आहेत? तरी, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी, अंढेरा पोलिस ठाण्याच्या कारभारात लक्ष घालून, या पोलिस ठाणे हद्दीत येणार्या गावांमधील अवैध धंदे बंद करण्यात यावे, अशी मागणीही ग्रामस्थ व महिलांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’कडे केली आहे.
केवळ मेरा बुद्रूक बीटच नाही तर शेळगाव आटोळ व मिसाळवाडी गावांमध्येसुद्धा खुलेआम गावठी दारूची विक्री होत आहे. तसेच, पोलिस येण्यापूर्वी या दारुविक्रेत्यांना खबर लागते, हेही विशेष. या दारूविक्रीकडे संबंधीत बीट जमादार कसे काय दुर्लक्ष करतात? हादेखील मोठाच प्रश्न आहे. दरम्यान, लोकांच्या खासगीतील गप्पांनुसार, अंढेरा क्षेत्रातील श्री लक्ष्मीदर्शन फार मोठे असावे? त्यामुळे अवैध धंदे, दारूविक्री हे प्रकार सर्रास सुरु असावेत, अशी शक्यताही ग्रामस्थांच्या गप्पांतून अधाेरेखीत हाेत आहे. तेव्हा जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तातडीने अंढेरा क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज आहे. या भागातील राजकीय नेतृत्वदेखील हा प्रकार पाहून गप्प बसलेले आहे. त्याबद्दलदेखील ग्रामस्थांतून खासकरून महिलांमधून संताप व्यक्त हाेत आहे.