– ‘टीईटी’ परीक्षा घोटाळ्यात सत्तारांच्या दोन्ही मुलींची नावे!
औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणाचे कनेक्शन आता सिल्लोडपर्यंत पोहचले आहे. या ‘टीईटी’ घोटाळ्यात सिल्लोडचे आमदार, माजी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन मुलींचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बोलताना सत्तार यांनी बदनामी करण्यासाठी कट रचला जातोय असा आरोप केला आहे. ‘आमची चूक असेल तर आमच्या मुलांवर कारवाई करावी. नसेल तर हे सर्व करणार्यांना फासावर लटकवा, चुकीची माहिती देऊन बदनामी करणार्यांवर कारवाई करावी’ अशी मागणी आ. सत्तार यांनी केली आहे. सत्तार हे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. हा घोटाळा पुढे आल्याने त्यांच्या मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
टीईटी घोटाळ्याच्या यादीत औरंगाबाद जिल्ह्यातील काही उमेदवारांचा समावेश असून, यादी जाहीर झाल्यानंतर गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची नावेही समोर आलेली आहेत. त्यात, सिल्लोडचे आमदार, माजी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन मुलींचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये सात शैक्षणिक संस्था असून, या संस्थांमध्येच या मुलीही सेवारत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांच्या अडचणीच वाढण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी अब्दुल सत्तार इच्छूक आहेत. मात्र, आता टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे त्यांच्यापर्यंत पोहोचल्याने त्यांना राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. हे प्रकरण वाढल्यास अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदाची संधीही हुकण्याची शक्यता आहे. हिना आणि उजमा या दोन्ही शिक्षिका अब्दुल सत्तार यांच्या मुली असून, २०२० मध्ये त्या अपात्र ठरल्या आहेत. सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली, त्यामध्ये या दोन्ही मुलींचा समावेश आहे. उजमा आणि हिना यांनी कुठल्या एजंटला पैसे दिले हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. शिक्षक पदभरतीसाठी घेतलेल्या परीक्षेतील मोठा घोटाळा उघड झाला असून, त्याचा ‘ईडी’कडून समांतर तपास केला जात आहे.
अब्दुल सत्तार यांनी आरोप फेटाळले
अब्दुल सत्तार यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. मी जी यादी पाहिली ती २०१९ मधील आहे. माझ्या मुलींनी परीक्षा २०२० मध्ये दिली होती. त्यात त्या अपात्र ठरल्या होत्या. मग या यादीत नाव येण्याचा प्रश्नच नाही. गेल्या चार वर्षांमध्ये जर माझ्या संस्थेकडून या संदर्भात शिक्षण विभागाला एखादे पत्र जरी गेले असेल तर आमच्यावर बिनधास्त कारवाई करा, असे सत्तार यांनी म्हटले आहे. हा माझ्या बदनामीचा कट आहे. या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांची चौकशी करावी, अशी मागणीदेखील सत्तार यांनी केली आहे.