Breaking newsHead linesMaharashtraPolitics

मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली, फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; बंडखोरांची धाकधुक वाढली!

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली असून, डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवस मुख्यमंत्री हे कुणाला भेटणार नाहीत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार उद्या-परवा होईल, असे सांगितले जात असतानाच, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबल्याने बंडखोर आमदारांची चांगलीच धाकधुक वाढली आहे. फडणवीस अचानक दिल्लीला गेल्याने, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत.
सतत दौर्‍यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थकले आहे. त्यामुळे त्यांनी सर्व कार्यक्रम व नियोजित प्रशासकीय बैठका तडकाफडकी रद्द केल्या आहेत. त्यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून, ते नवी दिल्लीला रवाना झाले आहेत. दरम्यान, शिंदे यांना आराम करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिल्याने, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फडणवीस यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीला बोलावून घेतले असल्याचे सांगण्यात येत असून, उद्या होणार्‍या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा नाही ना? अशी चर्चा सुरु झाली आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीसंदर्भात ते दिल्लीत वरिष्ठांशी चर्चा करतील, अशी शक्यता आहे. न्यायालयाचा निकाल विरोधात गेला आणि बंडखोर आमदार अपात्र ठरले, तर भाजपसमोर काय पर्याय आहेत? यासंदर्भात देवेंद्र फडणवीस पक्षश्रेष्ठींशी चर्चा करु शकतात अथवा ती रणनीतीही ठरवली जाऊ शकते. विशेषतः मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्तही अजून झालेला नाही, त्याची तारीखही बैठकीत निश्चित होऊ शकेल, असे राजकीय सूत्राने सांगितले आहे.


आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि शिंदे गटांच्या याचिकांवर सुनावणी पार पडली. त्यानुसार, पुढील सुनावणी कोर्टाने ८ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीत असलेल्या शिंदे सरकारचा सर्व कार्यक्रम खोळंबला गेला आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व कार्यक्रमांना स्थगिती दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले. फडणवीस हे तातडीने दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती समोर आली, तर शिंदे हे एकांतात आराम करत असल्याचे सांगण्यात आले. परंतु, हे दोघेही दिल्लीला भाजप श्रेष्ठींना भेटायला गेले असावेत, अशी शंका मुंबईत व्यक्त केली जात होती. शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले खरे; पण, महिना उलटला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाही. त्यामुळे शिंदे यांच्यासोबत असलेले बंडखोर आमदारही अस्वस्थ झालेले आहेत. पुढे नेमके काय होते? याबाबत त्यांची धाकधुक वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!