– रामनगरच्या शितोळे कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
– खचाखच भरलेल्या ऑटोवाल्यांकडे अंढेरा पोलिसांचे दुर्लक्ष कसे काय?
चिखली (एकनाथ माळेकर) – तालुक्यातील रामनगर येथील गौरव अरूण शितोळे (वय १३) या शाळकरी मुलाचा काल (दि.३) रोजी सव्वापाच वाजता शाळेतून घरी परत येत असताना, ऑटो पलटी होऊन रामनगर फाट्यासमोर जागीच मृत्यू झाला. गौरव हा मेरा खुर्द येथील शिवशंकर विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत होता. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणारे ऑटो हे अंढेरा पोलिसांच्या आशीर्वादाने कसे काय खचाखच भरून वाहतात? दरमहिन्याला अंढेरा पोलिसांचे वाहतूक पोलिस रोडवर नेमके कशासाठी उभे राहतात? असे प्रश्न आता निर्माण झाले असून, अंढेरा पोलिसांची जिल्हा पोलिस अधीक्षकांनी गोपनीय चौकशी करण्याची गरज निर्माण झालेली आहे. शाळकरी मुलाच्या दुर्देवी मृत्यूला अंढेरा पोलिसांचे ऑटोवाल्यांना असलेले आशीर्वादच कारणीभूत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
चिखली तालुक्यातील रामनगर येथील गौरव अरुण शितोळे हा अवघा १३ वर्षाचा विद्यार्थी मेरा खुर्द येथे शिवशंकर विद्यालय भरोसा वर्ग आठवीमध्ये शिक्षण घेत होता. पाच वाजता शाळा सुटल्यानंतर गौरव घरी जाण्यासाठी मेरा खुर्द फाट्यावर मित्रासोबत उभा होता. यावेळी शिवशंकर रामभाऊ जंगले याचा ऑटो मेरा चौकीवरून रामनगरकडे जात असताना, रामनगरच्या अलिकडील वळणावर पलटी होऊन, बाकीच्या विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागला. परंतु गौरव याच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याला चिखली येथील जवंजाळ हॉस्पिटल येथे नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यामुळे रामनगर येथील शितोळे परिवारावर खूप मोठे संकट कोसळले आहे. या घटनेने गावात एकच हळहळ व्यक्त होत होती, तसेच अंढेरा पोलिसांविषयी तीव्र संताप व्यक्त होत होता. या घटनेला जबाबदार असलेल्या ऑटोचालकावर कठोर कारवाई व्हावी. तसेच, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणारी वाहने, यांच्यावर पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई हाती घ्यावी, व अशा प्रकारचे दुर्देवी अपघात टाळावेत, अशी मागणीही आता पुढे आली आहे. अंढेरा पोलिस का कारवाई करत नाही, त्याचे गौडबंगाल काय? याची पोलिस अधीक्षकांनी गोपनीय चौकशी करून, माहिती घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. म्हणजे, महिनाकाठी किती उलाढाल होते? याची माहिती पोलिस अधीक्षकांना कळेल, अशी चर्चा परिसरातील ग्रामस्थ खासगीत बोलताना करत आहेत.
Leave a Reply