Breaking newsHead linesMaharashtra

एसटी कर्मचार्‍यांच्या जूनच्या पगाराचा प्रश्न सुटला!

– महागाई व घरभाडे भत्त्याचे १२०० कोटी द्या : संघटना
– राज्य सेवेत विलिनीकरण कधी? : सरकारला सवाल
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – राज्यातील एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारने एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे राज्य परिवहन महामंडळ (एसटी)च्या कर्मचार्‍यांचा जून महिन्याचा पगार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, आता जुलै महिना संपला असून, या महिन्याचा पगार कधी मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एसटी कर्मचार्‍यांचे राज्य सेवेत विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी कर्मचार्‍यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाला तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा होता. त्यामुळे ते आता एसटी कर्मचार्‍यांचे राज्य सेवेत विलिनीकरण करतील का?, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. तसेच, या कर्मचार्‍यांचे घरभाडे व महागाई भत्त्यापोटी १२०० कोटी रुपये शासनाकडे थकलेले आहेत. तेही तातडीने द्यावेत, अशी मागणी कर्मचारी संघटना करत आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांच्या जून महिन्यातील वेतनासाठी शिंदे-फडणवीस सरकारने १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या एसटी कर्मचार्‍यांचे जूनचे वेतन अदा करण्यासाठी एसटी महामंडळाला ३६० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. राज्य शासनाने २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात १ हजार ४५० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्यातील ३०० कोटी रुपये एप्रिलसाठी, तर ३६० कोटी रुपये मे महिन्याच्या वेतनासाठी देण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारने उर्वरित २६० कोटीदेखील तातडीने देण्याची गरज आहे.
एसटी महामंडळाचे कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात संपावर गेले होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या होत्या. एसटी कर्मचार्‍यांचे जवळपास महिनाभर आंदोलन चालले होते. या दरम्यानच्या काळात जिल्हे आणि गावे यांचा संपर्कच जणू काही तुटला होता, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या गंभीर परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचार्‍यांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या. त्यामध्ये पगारवाढीच्या मागण्या काही प्रमाणात मान्य करण्यात आल्या होत्या. कर्मचार्‍यांच्या मागण्यांना देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी पाठिंबा दर्शविला होता. परंतु, या संपामुळे एसटी महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.


दरम्यान, एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, की ‘एसटी महामंडळाला १०० कोटी दिले त्याबद्दल आम्ही सरकारचे आभार मानतो. पण एसटी कामगारांचा गेल्या महिन्यापासून तीन ते चार हजारांनी पगार कमी झाला आहे. कारण आम्हाल एकतर्फी पगारवाढ दिली होती, त्याचे ४८ हप्ते संपले आहेत. त्यामुळे तीन ते चार हजारांनी आमचे पगार कमी झाले आहेत. तसेच आमचे महागाई आणि घरभाडे भत्ताचे १२०० कोटी रुपये राज्य सरकारकडे देय आहेत. ते आम्हाला देण्यात यावे. जेणेकरून दर महिन्याला तीन ते चार हजारांनी कमी झालेला पगार मिळेल. एसटी कर्मचार्‍यांना राज्य सरकारमध्ये सामील करुन घ्यावे, ही भूमिका आहे. ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीदेखील भूमिका आहे. ते लवकरात लवकर व्हावे, अशी मागणीही संदीप शिंदे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!