श्रीरामपूर हादरले! बँक गार्डच्या बंदुकीतून गोळी सुटली; ग्राहक जागीच ठार!
– बँकेच्या आवारात रक्ताचा सडा; गोळी डोक्यातून आरपार गेली
श्रीरामपूर (तालुका प्रतिनिधी) – जिल्हा सहकारी बँकेच्या श्रीरामपूर शाखेत आलेल्या अजित जोशी या ग्राहकाला अशोक बँकेच्या सिक्युरिटी गार्डच्या बंदुकीतून सुटलेली गोळी लागून, त्यांचा जागीच मृत्यू झाला. अचानक लोड असलेल्या बंदुकीतून गोळी सुटून ही घटना घडल्याचे सांगितले जात असले तरी, पोलिस या घटनेचा सर्व अंगाने तपास करत आहे. सुटलेली गोळी जोशी यांच्या डोक्यात घुसून आरपार गेली. त्यामुळे बँकेच्या आवारात रक्ताचा अक्षरशः सडा पडला होता. घटनास्थळी एकच खळबळ उडाली हाेती. पोलिसांनी सुरक्षा रक्षक दशरथ पुजारी याला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी केली जात होती.
श्रीरामपूर येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत श्रीरामपूर शहरातील नागरिक अजित जोशी हे बँकेच्या कामासाठी आले होते. त्याचवेळी श्रीरामपूर येथील अशोक बँकेचे कर्मचारी हेदेखील पैशाचा भरणा करण्यासाठी बँकेत आले होते. या कर्मचार्यांसोबत सुरक्षा कर्मचारी दशरथ पुजारी हे लोडेड बंदूक घेऊन आले होते. पैशाचा भरणा व बँकेतील काम आटोपून अशोक बँकेचे कर्मचारी हे आपल्या वाहनात बसत असताना, पुजारी यांच्याकडील बंदुकीतून अचानक गोळी सुटली व त्याचवेळी पार्किंगमध्ये असलेल्या अजित जोशी यांच्या डोक्यातून ती गोळी आरपार गेली. जोशी हे पार्किंगमधून गाडी काढत होते, त्यामुळे काही क्षणातच ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
गोळीबाराचा आवाज ऐकून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व तातडीने रुग्णवाहिका बोलावली. जोशी यांना तातडीने स्थानिक साखर कामगार रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. बँकेच्या आवारात रक्ताचा अक्षरशः सडा पडला होता, त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती कळताच, श्रीरामपूरचे पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक संजय सानप हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुरक्षा रक्षक दशरथ पुजारी यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडील बंदूकही ताब्यात घेतली हाेती. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस करत आहेत.
सोशल मीडियावर विविध नागरिकांनी काढलेले घटनास्थळाचे व्हिडिओ फिरत असून, ते पाहिले असता, हा सर्व प्रकार थंड डोक्याने केलेला खून असल्याचा प्रथमदर्शनी संशय निर्माण होतो आहे. त्यामुळे एकूणच या सर्व प्रकाराची श्रीरामपूर पोलिसांनी, विशेष करून कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे डीवायएसपी संदीप मिटके यांनी सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची गरज आहे. खरेच चुकून गोळी सुटली?, की गोळी घालून हत्या केली??, या प्रकरणाचा पोलिसांनी सोक्षमोक्ष लावावा, असा सूर नागरिकांतून व्यक्त होत आहे.