Marathwada

ब्राम्हणगाव तांडा रस्त्याची दुर्दशा; रिक्षा प्रवाशांसह वाहून जाताना वाचली!

– तहसीलदारांनी केली पाहणी; परंतु कार्यवाही शून्य, संबंधित ठेकेदारही कुणाला जुमेना!
पैठण (शिवनाथ दौंड) – तालुक्यातील ब्राम्हणगाव तांडा रस्त्याची दुर्दशा अद्यापही संपली नसून, या रस्त्याने जाताना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. वारंवार या रस्त्यावर अपघात घडूनही जिल्हा प्रशासन दखल घेत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. आजदेखील सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एक रिक्षा ब्राम्हणगाव तांडाकडे जात असताना, अचानक पाणी आल्याने रिक्षा घसरली व पाण्यात वाहून जाऊ लागली. या रिक्षात चालकासह, दोन महिला व रुग्ण बसलेला होता. सुदैवाने काही दुर्देवी प्रकार घडला नाही. तांड्यावरील ग्रामस्थांनी पाण्याच्या बाहेर कशीबशी रिक्षा काढली. जिल्हा प्रशासनाला या धोकादायक रस्त्यावर काही बळी हवे आहेत का, असा संताप व्यक्त होत आहे. पैठण तहसीलदारांनी रस्त्याचा पंचनामा केला होता. परंतु, पुढे काहीही कार्यवाही केली नाही. हा रस्ता करणारा ठेकेदार एका बंडखोर राजकीय नेत्याचा निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येते.
तालुक्यातील ब्राम्हणगाव ते ब्राम्हणगाव तांडा या रस्त्याचे काम रखडलेले असून, हा रस्ता मंजूर होऊनही त्याचे काम केले जात नाही. तर रस्ता हा अत्यंत धोकादायक बनलेला आहे. पावसाळ्यात रस्त्याला नदीचे स्वरुप प्राप्त होते. त्यामुळे वारंवार या रस्त्यावर अपघात होत आहेत. आज तर अचानक पाऊस आल्याने व रस्त्यावर पाण्याचा जोर वाढल्याने रिक्षा घसरून पडली व पाण्यात वाहून जाऊ लागली. एमएच २० इएफ १०८३ असा या रिक्षाचा क्रमांक असून, चालक साहेबराव जाधव यांना या दुर्देवी घटनेत मोठा मार लागलेला आहे. तसेच, यशवंत राठोड यांनाही मुका मार लागला असून, डोक्यावरही मार लागलेला आहे. रिक्षात दोन महिला व एक रुग्ण देवीदास राठोड हे होते, ते कसे तरी बचावले आहेत. पाण्यात रिक्षा वाहून गेल्याने, ती मोठ्या शिताफीने बाहेर काढावी लागली, त्यात तिचे मोठे नुकसान झाले आहे. या रस्त्याच्या कामात प्रचंड हलगर्जीपणा होत असून, ठेकेदार हा एका बंडखोर नेत्याच्या जवळचा असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे तो कुणाला जुमानत नसून, रस्त्याचे काम घेऊनही करत नाही. या रस्त्याबाबत नागरिकांनी वारंवार आवाज उठवलेला आहे. तहसीलदारांनी पाहणीदेखील केलेली आहे. तरीही काम केले जात नाही, त्यामुळे या तांड्यावरील ग्रामस्थांचे जीव धोक्यात आले आहे. आमदार संदीपान भुमरे याप्रश्नी लक्ष घालतील का, असा संतप्त प्रश्न बंजारा समाज बांधव उपस्थित करत आहेत. गेल्या वर्षीदेखील याच रस्त्याने एका बालकाचा बळी घेतला होता तसेच त्याची माता बालंबाल बचावली होती. तरी, तातडीने हा रस्ता पूर्ण करावा, अन्यथा आक्रमक भूमिका घेऊ, असा इशारा बंजारा ब्रिगेड, ब्राम्हणगाव यांच्यावतीने या संघटनेचे जिल्हा सचिव संतोष राठोड यांनी दिला आहे.


आडुळ ते ब्राह्मणगाव व ब्राह्मणगाव ते ब्राह्मणगाव तांडा रस्त्याचे काम होत का नाही? रस्ता मंजूर होऊन व त्याची कामाची तारीख देखील संपून दोन वर्षे उलटून गेलेले आहेत, तरी देखील संबंधित ठेकेदारावर कारवाई का करत नाही? या कामात हलगर्जीपणा दिसून येत आहे. या कामाचे ठेकेदार याच्यावर कुणाचा वरदहस्त आहे? मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता व ठेकेदार रोहन जाधव यांच्या हलगर्जीपणामुळे तांड्यातील नागरिकांना जीवाशी खेळावे लागत आहे.  गेल्या वर्षी देखील या रस्त्याने एका बालकाचा मृत्यू झाला होता व माता बालबाल बचावली होते. अशीच एक घटना आज 5.वा ब्राह्मणगाव तांडा येथील रस्त्यावर घडली.

उद्या लगेच कामाला सुरुवात करणार; तहसीलदारांचे आश्वासन!
दरम्यान, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने हे वृत्त प्रसारित करताच, पैठण तहसीलदारांनी दूरध्वनी करून, उद्या लगेच कामाला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम सुरु होते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!