ChikhaliPolitics

मेरा बुद्रूक गट ‘सर्वसाधारण’ सुटताच अनेकांच्या आशा पल्लवित!

– मेरा बु. गटातून ‘सर्वसाधारण महिला’ आरक्षण असल्याने अनेकांचे देव पाण्यात!
– हौसे-नवसे पुढारी पत्रकारांना म्हणतात, आमची बातमी घ्या!
मेरा बुद्रूक, ता. चिखली (प्रताप मोरे) – चिखली तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचे आरक्षण २८ जुलैरोजी जाहीर झालेले आहे. त्यामध्ये मेरा बुद्रूक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी (ओपन) जाहीर होताच, अनेक राजकीय पक्षांच्या हौसे, नवसे पुढार्‍यांना निवडणुकीचे डोहाळे लागलेले आहेत. अनेकांनी तर पत्रकारांकडे आमची बातमी घ्या, म्हणून तगादा लावलेला असून, आम्ही निवडणुकीसाठी इच्छूक आहोत, आमची बातमी छापा, चांगले छापा, अशी फोनाफोनी सुरु केली आहे. त्यामुळे या सर्कलमध्ये इच्छूक उमेदवारांना निवडणुकीचे डोहाळे असले तरी, मतदारांच्या पारावर, सार्वजनिक ठिकाणी मात्र वेगळ्याच गप्पा रंगत आहेत. जो जास्तीत जास्त नोटा देईल, तोच सदस्य निवडून येईल, अशा चर्चा मतदार करत आहेत. या चर्चेतून या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष बाब म्हणजे, मतदान हे कर्तव्य असून, पैसे घेऊन मतदान करणे गैर व बेकायदेशीर असल्याचे माहिती असूनही मतदार खासगीत अशा प्रकारच्या गप्पा करत आहेत, हे विशेष.
चिखली तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गट आणि १६ पंचायत समिती गण अशा एकूण २४ जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये मेरा बु जि.प. आरक्षण सर्वसाधारण महिला आणि पं.स. आरक्षण सर्वसाधारणसाठी घोषित झाले आहे. मेरा बु. जि.प. सर्कलमध्ये प्रथम काँग्रेस, द्वितीय राष्ट्रवादी काँग्रेस, तृतीय भाजप व शिवसेना चौथ्या आणि इतर पक्ष पाचव्या क्रमांकावर असतात. या जि.प. सर्कल मध्ये मेरा बु. आणि अंत्री खेडेकर ही दोन गावे राजकीय दृष्टीने जिल्ह्यात प्रसिद्ध असल्याने या दोन्ही गावांचा सर्कलमध्ये बोलबाला असतो. मात्र या मेरा बु. सर्कलमध्ये काँग्रेस प्रथम क्रमांकावर असल्याने सतत दोन ते तीन पंचवार्षिकमध्ये जि. प. आणि पं.स. निवडणुकीत मेरा बु. गावानेच आपले वर्चस्व कायम राखून, गावातील व्यक्तींनाच सदस्य म्हणून निवडून दिले आणि निवडूनसुध्दा येत आहेत. सध्या काँग्रेस पक्षाचेच सदस्य दोन पंचवार्षिकपासून पदावर होते.
सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने अनेक लोकप्रतिनिधी यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. परंतू आता आघाडी सरकारमध्ये फूट पडली आणि शिंदे सरकार स्थापन झाले. त्यामुळे या सर्कलमध्ये ‘कही खुशी कभी गम’ असे चित्र निर्माण झाले आहे. आता तर जि.प. आणि पं.स. दोन्हीही गट आणि गण सर्वसाधारण जाहीर झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीला लागले, आणि वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी मोर्चा बांधणीला सुरवात केली आहे. परंतु जिल्हा परिषद महिला आरक्षण सुटल्यामुळे अनेक नेत्यांचा हिरमोड झाला. कारण अगोदरच या सर्कलमध्ये महिला सदस्य राहून गेल्या आहेत.


सर्वसामान्य महिलांना सक्षम बनविण्यासाठी राष्ट्रपतीपदावर एक आदिवासी महिलेला विराजमान केले, त्यामुळे सर्वांनाच आता जि.प.च्या सर्वसाधारण जागेसाठी महिला उमेदवार द्यावा लागणार असल्याने मेरा बु. जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यासाठी असे अनेक नेते सरसावले आहेत. तर काही नेते असे दाखवतात की मला सर्व स्तरातून सर्कलमध्ये चांगला पाठिंबा मिळणार आहे, आमच्या महिला उमेदवारांना मतदार नक्कीच विजय करणार, याची आशा सर्वांनाच लागून आहे. परंतु, जो या सर्वसाधारण जागेसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरेल, त्याला मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन घडवावे लागणार आहे, अशीच चर्चा मतदारांतून रंगताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!