राज्यपालांच्या ‘अगदीच बावळट’ विधानावरून महाराष्ट्र भडकला!
– राज्यपालांना घरी पाठवायचे की तुरुंगात? वेळ आली आहे : उद्धव ठाकरे
– तुमचा हेतू न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही, इतकंच सांगतो : राज ठाकरेंचा इशारा
– राज्यपाल हे नियमित गुन्हेगार : सुप्रिया सुळे संतापल्या
– हे महाशय केवळ राज्यपालपदाचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळताहेत; संभाजीराजे कडाडले
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास पैसाच शिल्लक राहणार नाहीत, असे वादग्रस्त आणि अगदीच निव्वळ बावळटपणाचे वक्तव्य करून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतःची आणि त्यांच्या महामहिम राज्यपालपदाची लाज घालवली. त्यांच्या या बावळट विधानाचे राज्यभर संतप्त पडसाद उमटले. सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या या विधानाचा निषेध केला. राज्यपालांच्या विधानाशी सहमत नाही, अशी प्रतिक्रिया वाचून दाखवत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपला निषेध नोंदवला. तर उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितले म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपालांना ठणकावले. तर, ज्या राज्यात तुम्ही जाता, ज्या राज्याची जबाबदारी तुम्हाला दिली जाते. त्या राज्यात सुखाने आणि आनंदाने नांदणार्या नागरिकांमध्ये जाती-पाती, धर्मांवरून फूट पाडण्याचे आणि त्यांच्यात आग लावण्याचे काम जर कोश्यारी यांनी केले असेल, तर त्यांना नुसते घरी पाठायचे की तुरुंगात पाठवायचे, हा विचार करण्याचीदेखील वेळ आलेली आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना ठणकावले. सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर, राज्यपालांनी सारवासारव करत, महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान आहे, अशी प्रतिक्रिया राज्यपाल कोश्यारी यांनी दिली.
राज्यपालांच्या अगदीच बावळट विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की खरे म्हणजे, राज्यपालांचे विधान हे वैयक्तिक आहे. आम्हाला ते मान्य नाही. मुंबईच्या विकासामध्ये मराठी माणसाचे योगदान कुणीही नाकारू शकत नाही, मुंबईसाठी १०५ जणांनी आहुती दिली आहे, त्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली आहे. मराठी माणसामुळे मुंबईमुळे वैभव प्राप्त झाले आहे, असे शिंदे यांनी सांगितले. तर कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असून, काही नेत्यांकडून राज्यपाल हटाव अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या विधानाशी आम्ही सहमत नाहीच. महाराष्ट्राच्या विकासामध्ये तसेच वाटचालीमध्ये मराठी माणसाचे श्रेय सर्वाधिक असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून, उद्योगाच्या क्षेत्रात देखील मराठी माणसाने जी प्रगती केली आहे. त्यामुळे आज जगभरामध्ये मराठी माणसाचे नाव झालेले आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर राज्यपालांनी तातडीने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शुक्रवारी एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, की जर मुंबईतून गुजराथी आणि राजस्थानी समाज बाहेर पडला तर मुंबईत पैसाच राहणार नाही, आणि हे शहर देशाची आर्थिक राजधानीही राहणार नाही. त्यांच्या या वक्तव्यातून मराठी माणसांचा अप्रत्यक्षरित्या घोर अपमान तर झालाच; परंतु मुंबई महाराष्ट्रात आणण्यासाठी शहीद झालेल्या मराठी हुतात्म्यांचाही अवमान झाला आहे. त्यानंतर राज्यभर राज्यपालांविरोधात आंदोलने झाली. तसेच, राज्यपालांचा निषेध करण्यात आला. शिवसेना, मनसे यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील राज्यपालांवर कठोर शब्दांत टीका केली. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्या पदावर बसलेल्या व्यक्तीने बोलताना असे विधान करताना काळजी घेतली पाहिजे. मुळात राज्यपाल हे पद पक्षविरहित असून, राज्यपाल हे राज्याचे पालक असतात. या पदावर बसून असे विधान करणे म्हणजे त्या पदाचा अवमान असल्याची टीका, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. एकीकडे, सर्व नेते राज्यपालांवर टीका करत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मात्र राज्यपालांच्या विधानाचे खोचकपणे समर्थन केले. ते म्हणाले, इतके वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीने राज्यात सत्ता केली. परंतु मराठी माणसाच्या हातात आर्थिक व्यवहार देऊ शकला नाही. राज्यपालांनी मराठी माणसाचे डोळे उघडे केले. त्यामुळे मराठी माणसांनी या बुजगावण्यांसोबत राहायचे की नवीन नेतृत्वामागे उभे राहायचे? राज्यपालांच्या विधानाने महाराष्ट्राचा बिल्कुल अपमान झाला नाही, असेही आंबेडकर म्हणाले. तर, प्रत्येकाला समान वागणूक देणे ही राज्यपालांची जबाबदारी आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे लोकांमध्ये तेढ आणि फूट निर्माण करत आहेत. त्यांनी लोकांना दुखावले आहे, आणि ते नियमित गुन्हेगार आहेत. मी राष्ट्रपतींना राज्यपालांना हटवण्याची विनंती करते, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्यपाल कोश्यारींवर खरमरीत टीका केली आहे. विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत, असं म्हणत संभाजीराजे यांनी कोश्यारींवर टीकास्त्र सोडले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगत सिंग कोश्यारी म्हणाले, की महाराष्ट्रातून विशेषतः मुंबई, ठाण्यातून गुजराती, राजस्थानी लोकांना बाहेर काढले तर महाराष्ट्रात पैसाच उरणार नाही. मुंबई आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखली जाणार नाही. मराठी माणसांना कमी लेखत गुजराती आणि राजस्थानी समाजामुळे मुंबईत पैसा असल्याचे कोश्यारी म्हणाले होते.