लोणार सरोवरासाठी ३७० कोटी; मुख्यमंत्र्यांनी श्रेय दिले आ. रायमुलकर, खा. जाधव यांना!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या जतन, संवर्धन व विकासकामांसाठी राज्य सरकारने ३७० कोटी रुपये मंजूर केले आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर व बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना दिले आहे. आमदार रायमुलकर यांनी याप्रश्नी सातत्याने आपल्याकडे पाठपुरावा केला होता, अशी कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या निर्णयाबद्दल आमदार रायमुलकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले आहेत.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले राजकीय गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. त्याच प्रमाणे, जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या जतन, संवर्धन व विकासासाठी विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. जवळपास ३७० कोटींचा हा विकास आराखडा असून, जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ, विविध सोयीसुविधा आणि सरोवराचे नैसर्गिक संवर्धन यासाठी या आराखड्यात तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.
आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही त्यांनी पाठपुरावा केला होता. उद्धव ठाकरे हे लोणार भेटीवर आले असता, त्यांनी २७० कोटींच्या विकास आराखड्याची घोषणा केली होती. अखेर शिंदे सरकारने या आराखड्यास मान्यता दिली असून, न्यायालयीन आदेशाचेही यानिमित्ताने सरकारने पालन केले आहे. या आराखड्यानुसार विकासकामे करण्यासाठी तब्बल सहा मंत्रालयीन विभाग देखरेख ठेवणार असून, पर्यटनवाढीसाठी विविध उपाययोजना सूचविण्यात आलेल्या आहेत. या आराखड्यामुळे शेगाव, हिवरा आश्रम, सिंदखेडराजा या धार्मिक व पर्यटन स्थळांचाही आपोआप विकास होणार आहे. या शिवाय, ग्रामीण भागातील भूमिहिन लोकांना घरासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने, या सरकारच्या काळातच बेघर आणि भूमिहिन लोकांना हक्काचे घर मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे.
लोणार सरोवरच्या संवर्धनासाठी ३७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा मोठा निर्णय बुधावरच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लोणार सरोवराला भेट देत येथील विकास व संवर्धनासाठी २०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. उद्धव ठाकरेंचा लोणार विकास हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लोणार संवर्धनासाठी उद्धव ठाकरेंपेक्षा १७० कोटी जास्त देत ३७० कोटीच्या निधी देण्याची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंच्या या ड्रीम प्रोजेक्टला एकनाथ शिंदेंनी मोठं खतपाणी दिल्याची सध्या चर्चा सुरू झाली आहे.