रविकांत तुपकर-उद्धव ठाकरेंची चर्चा फिस्कटली; तुपकरांचे ‘एकला चलो’!
- बुलढाण्यातून जयश्रीताई शेळकेच शिवसेनेच्या उमेदवार!
– रविकांत तुपकर घेणार शरद पवारांची भेट; लवकरच राजकीय भूमिका जाहीर करणार!
मुंबई (खास प्रतिनिधी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या दिशेनेच बुलढाणा विधानसभा निवडणुकीची परिस्थिती निर्माण केली असून, बुलढाण्यातून उमेदवारीसाठी ‘मातोश्री’वर गेलेल्या शेतकरी नेते रविकांत तुपकर व उद्धव ठाकरे यांची चर्चा फिस्कटली आहे. बुलढाण्यातून जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्याऐवजी काँग्रेस नेत्या जयश्रीताई शेळके यांना उमेदवारी दिली जात असून, लवकर त्या शिवसेनेत प्रवेश करतील, व त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. रविकांत तुपकर यांच्याऐवजी जयश्रीताई शेळके यांचे नावच प्रा. नरेंद्र खेडेकर व जालिंधर बुधवत यांच्याकडून पुढे गेल्याची माहिती चर्चेत आहे. दरम्यान, तुपकरांनी तडकाफडकी ‘मातोश्री’ सोडली असून, जिल्ह्यातील शेतकरीवर्ग आता महाआघाडीला कितपत साथ देतील? हाप्रश्न निर्माण झाला आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर व उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चा फिस्कटल्यानंतर तुपकर हे शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. तेथे ते शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत. आपल्यापुढे स्वतंत्र लढणे, वंचित आघाडीसोबत जाणे किंवा महायुतीसोबत जाणे असे तीनच पर्याय उरले आहेत. उद्धव ठाकरे यांनी संधी दिली असती तर मतविभाजन टळले असते. यापुढे त्यांनी रविकांत तुपकरांमुळे आमची जागा गेली, असे सांगू नये, अशी भूमिकाही चर्चेतून बोलताना व्यक्त केली.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी महाआघाडीसोबत यावे, यासाठी महाआघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी प्रयत्न केले होते. परंतु, बुलढाण्याची जागा शिवसेना (ठाकरे) पक्षाकडे असल्याने त्यांनी तुपकरांना उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार, ठाकरे व तुपकर यांच्यात चर्चेच्या अनेक पैâर्या झडल्या. तुपकरांनी महाआघाडीसोबत यावे, यासाठी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनीदेखील चर्चा केली. बुलढाणा येथून रविकांत तुपकर यांना उमेदवारी निश्चित मानली जात असताना, आज अचानक वेगवान घडामोडी घडल्या व काँग्रेस नेत्या जयश्रीताई शेळके या ‘मातोश्री’वर पोहोचल्या. त्यानंतर रविकांत तुपकर यांनादेखील बोलावून घेण्यात आले. आपण, शिवसेनेला सहकार्य करा, आपले योग्यवेळी पुनर्वसन करू, अशा शब्द ठाकरे यांनी तुपकरांना दिला. तर बुलढाण्यात तुम्हाला संजय गायकवाड यांचा पराभव हवा असेल तर, मला उमेदवारी आवश्यक आहे. महाआघाडीला इतरही ठिकाणी सहकार्य करणे शक्य होईल, तसेच विविध सर्वेक्षणाचे निष्कर्षदेखील तुपकरांनी ठाकरे यांना समजावून सांगितले. ‘निवडणूक निकालानंतर तुम्हाला माझे प्रत्येक शब्द आठवतील’, असेही तुपकर यावेळी आग्रहाने म्हणाले. परंतु, उद्धव ठाकरे यांनी यावेळेस सहकार्य करा, अशीच भूमिका कायम ठेवली. त्यामुळे चर्चा फिस्कटल्याने रविकांत तुपकर हे तडकाफडकी ‘मातोश्री’वरून बाहेर पडले. दरम्यान, जयश्रीताई शेळके यांची उमेदवारी निश्चित झाल्यातच जमा असून, लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. एकंदरित, बुलढाण्यात शिंदे गटाचे संजय गायकवाड, शेतकरी संघटना क्रांतीकारीचे रविकांत तुपकर व ठाकरे गटाच्या जयश्रीताई शेळके यांच्यात तिहेरी लढत निश्चित मानली जात आहे.
दरम्यान, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या समर्थकांनी आज चिखली व सिंदखेडराजा येथून उमेदवारी नामांकन अर्ज घेतले आहेत. शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी ही माहिती दिली. कोणी कुठून अर्ज भरायचे, हे रविकांत तुपकर यांच्यासोबत चर्चा करून ठरवले जाईल, तसेच रविकांत तुपकर हे कोठून लढणार तेही लवकरच स्पष्ट होईल, असे विनायक सरनाईक यांनी सांगितले.
फायर ब्रॅण्ड नेत्या जयश्रीताई शेळके लवकरच शिवसेनेत?; बुलढाण्यातून उमेदवारी?