फायर ब्रॅण्ड नेत्या जयश्रीताई शेळके लवकरच शिवसेनेत?; बुलढाण्यातून उमेदवारी?
- रविकांत तुपकर, जयश्रीताई शेळके थोड्याच वेळात 'मातोश्री'वर पोहोचणार!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – बुलढाणा विधानसभेसाठी शिंदे गटाचे पुन्हा एकदा संजय गायकवाड यांनाच उमेदवारी जाहीर केल्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षानेदेखील येथील उमेदवार जाहीर करण्यासाठी आज युद्धपातळीवर हालचाली चालवल्या आहेत. शिवसेनेच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या नेत्या तथा जिल्ह्याच्या फायर ब्रॅण्ड नेतृत्व जयश्रीताई शेळके यांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश होणार असून, त्यांनाच बुलढाणा विधानसभेच्या जागेसाठी महाआघाडीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनादेखील ‘मातोश्री’वर बोलावण्यात आले आहे.
महाआघाडीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले असून, बुलढाणा व मेहकरची जागा शिवसेना (ठाकरे) पक्षालाच सुटलेली आहे. येथून उमेदवारीसाठी शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, जयश्रीताई शेळके व रविकांत तुपकर हे इच्छूक आहेत. दरम्यान, राजकीय सूत्राच्या माहितीनुसार, जयश्रीताई शेळके यांचा आजच शिवसेनेत प्रवेश होणार असून, त्यांना बुलढाणा येथून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने स्थानिक नेते ‘मातोश्री’वर पोहोचले आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर हेदेखील महाआघाडीसोबत रहावेत, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रयत्न करत आहे. तथापि, रविकांत तुपकर हेदेखील बुलढाणा येथूनच लढण्यास इच्छुक आहेत. तथापि, पुढील काही तासांतच सर्व चित्र स्पष्ट होईल, असेही या राजकीय सूत्राने सांगितले. दरम्यान, रविकांत तुपकर, जयश्रीताई शेळके व स्थानिक नेते हे लवकरच मातोश्रीवर पोहोचत आहेत.