महाआघाडीचे उमेदवार म्हणून लढा; खा. संजय राऊत यांची रविकांत तुपकर यांना ‘ऑफर’?
- शिवसेना नेते खा. संजय राऊत व रविकांत तुपकर यांची मुंबईतील 'सामना' कार्यालयात बैठक
– जालिंधर बुधवत यांच्या बुलढाण्यातून लढण्यावर पाणी फेरणार का?
मुंबई (प्रतिनिधी) – शिवसेना नेते खा. संजय राऊत व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची मुंबईतील दैनिक ‘सामना’ कार्यालयात बैठक झाली असून, या बैठकीत तुपकर यांनी महाआघाडीकडून शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून लढण्याची ऑफर तुपकरांना देण्यात आल्याची खात्रीशीर माहिती वरिष्ठस्तरीय सूत्रांकडून हाती आली आहे. त्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात गावभेट दौरे करणारे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांचे आमदारकीचे स्वप्न यंदा भंगणार का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. तुपकरांनी बुलढाणासह काही जागा शिवसेनेकडे मागितल्या असून, त्याबाबत मात्र त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही, अशीही खात्रीशीर माहिती राजकीय सूत्राने दिली आहे.
लोकसभेला रविकांत तुपकर यांच्यामुळे बुलढाण्यात महाआघाडीला मोठा फटका बसला होता. शिवसेना (ठाकरे) पक्षाची जागा अगदी कमी मतांच्या फरकाने हातातून गेली होती. त्यामुळे तुपकरांना सोबत घ्या, अशी सूचना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाआघाडीच्या नेत्यांना केल्याची खात्रीशीर माहिती असून, बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून तुपकरांनी लढावे, असा महाआघाडीतील नेत्यांचा प्रस्ताव आहे. परंतु, आधीच २५ जागा लढण्याची घोषणा केलेल्या रविकांत तुपकरांनी बुलढाणा, अकोला, वर्धा, हिंगोली जिल्ह्यांतील काही जागा आपल्या समर्थकांसाठी मागितल्याने महाआघाडीसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. रविकांत तुपकर व उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वरील बैठकीनंतर आज तुपकर व शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची मुंबईतील ‘सामना’ कार्यालयात बैठक झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, खा. राऊत यांनी तुपकर यांची समजूत काढली व तुम्ही बुलढाणा मतदारसंघावर फोकस करा, तेथे आम्हाला गद्दार पाडायचा आहे, असे तुपकरांना सांगितले. परंतु, तुपकरांनी मात्र आपल्या काही समर्थकांसाठी आग्रह धरला.
बुलढाण्यात आम्हाला गद्दाराला पाडायचे आहे, तुम्ही महाआघाडीसोबत नाही तर शिवसेनेत (ठाकरे) या. तुम्हाला मानाचे पान दिले जाईल, शेतकरी चळवळीची जबाबदारीही तुमच्याकडे सोपवली जाईल, अशी भूमिका खा. संजय राऊत यांनी याप्रसंगी घेतली असल्याचेही खात्रीशीर सूत्राने सांगितले आहे. त्यावर आता रविकांत तुपकर यांना आपली भूमिका घेऊन, शिवसेना नेतृत्वाला आज किंवा उद्याच कळवायचे आहे, असेही हे सूत्र म्हणाले.
———–