राज्यात कोणत्याहीक्षणी आचारसंहिता लागू होणार!
- सह्याद्री अतिथीगृहावर महायुती सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक
– आज रात्रीपासून मुंबईत प्रवेश करताना लागणार्या पाचही टोलनाक्यांवर टोलमाफी!
मुंबई (खास प्रतिनिधी) – राज्यात कोणत्याहीक्षणी आचारसंहिता लागणार असल्याची माहिती वरिष्ठ प्रशासकीय सूत्राने ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला दिली आहे. त्यामुळेच आज राज्यातील महायुती सरकारने तडकाफडकी मंत्रिमंडळ बैठक घेऊन, मुंबईत प्रवेश करताना लागणार्या पाचही टोलनाक्यांवर हलक्या मोटार वाहनांना संपूर्ण टोलमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच रात्री बारा वाजल्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
काल रविवारी सुट्टी असतानाही मंत्रालयात कामकाज सुरू होते. आपण पुन्हा सत्तेवर येणार नाही, याची कुणकुण सत्ताधारी पक्षाला लागलेली दिसत असून, त्यामुळे महायुतीच्या सरकारने कालपासून कामाचा सपाटा लावला आहे. तसेच, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकप्रिय निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबईत प्रवेश करताना लागणार्या पाचही टोलनाक्यांवर हलक्या मोटार वाहनांना संपूर्ण टोलमाफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये आनंदनगर टोलनाका, दहिसर टोलनाका, मॉडेला टोलनाका, वाशी टोलनाका आणि एरोली टोलनाका या पाच टोलनाक्यांचा समावेश आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार असून, त्यात महाराष्ट्रात आचारसंहिता लागू केली जाणार असल्याचे वरिष्ठ प्रशासकीय सूत्राने सांगितले आहे. त्यामुळे सह्याद्री अथितीगृहावर मंत्रिमंडळ बैठक घेऊन लोकप्रिय निर्णय घेण्यात आलेत. तसेच, काल सुट्टी असतानाही सामाजिक न्याय विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आले असून, आज सकाळपासून मंत्रालयात प्रचंड गर्दी दिसून येत आहे.
– मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय –
1. मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ पासून अंमलबजावणी. (सार्वजनिक बांधकाम)
2. आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय)
3. समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम (उच्च व तंत्रशिक्षण)
4. दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा)
5. आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा)
6. वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)
7. राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल)
8. पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल)
9. खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल)
10. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार
11. पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास)
12. किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ (सहकार)
13. अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार)
14. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे (वैद्यकीय शिक्षण)
15. खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण)
16. मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा)
17. अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट
18. उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)
19. कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास)
20. दमण गंगा आणि गोदावरी नदी जोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.