BULDHANAHead linesNagpurVidharbha

महापुरुषांच्या विचाराचा मुसाफिर खांद्यावर निळा झेंडा घेऊन निघाला पायी दीक्षाभूमीवर!

- मुसाफिर हू यारो, मुझे बस चलते जाना है...!; बाबासाहेबांना नतमस्तक होऊन येणार माघारी!

बुलढाणा (संजय निकाळजे) – मुसाफिर हू यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना है.. असाच एक महापुरुषांच्या विचाराचा मुसाफिर गेल्या आठ दिवसापासून दीक्षाभूमी नागपूर येथे निघाला आहे. बाबासाहेबांच्या चरणी ‘नतमस्तक’ होण्यासाठी,तेही पैदल.! त्याचाच हा वृत्तांत.

आयुष्याच्या बेरजेमध्ये अनेक जण नवस करत असतात. मात्र चिखली तालुक्यातील पांढरदेव येथील महापुरुषांच्या विचाराचा पाईक गणेश श्रीराम वाकोडे (वय ४७) हे ‘संकल्प’ करून पैदल नागपूर दीक्षाभूमीवर निघाले आहेत. त्यांच्याशी मोबाईल द्वारे आमचे विशेष प्रतिनिधी संजय निकाळजे यांनी बातचीत केल्यानंतर दोन ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता त्यांचे घरून ‘प्रस्थान’ झाले. खांद्यावर बाबासाहेबांचा फोटो असलेला निळा झेंडा घेऊन खामगाव, अकोला, अमरावती मार्गे ते बुधवार ९ ऑक्टोबर रोजी कोंढाळी येथे मुक्काम ठोकणार आहेत. गेल्या आठ दिवसाच्या प्रवासामध्ये त्यांनी दररोज २५ ते ३० किलोमीटरचा प्रवास केला आहे. या प्रवासामध्ये अनेक जिवाभावाची ‘माणसं’ भेटली असून संध्याकाळचा मुक्काम एखाद्या गावात बुद्ध विहारांमध्ये असतो. यावेळी बुद्ध विहारात बसल्यानंतर दिवसभर चालण्याचा ‘थकवा’ निघून तर जातोच, मात्र जमा झालेल्या समाज बांधवांमध्ये चर्चा केल्यानंतर विचारांची देवाण-घेवाण देखील होत असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी दोन-तीन वेळेस रेल्वेने नागपूरला गेलो, मात्र काहीही बघावयास मिळाले नाही. यावेळेस अनेक ठिकाणची बुद्ध विहार, माणसं तर मिळालीच मात्र महापुरुषांच्या विचारांची देवाणघेवाण देखील एकमेकांसोबत करता आली. असे सांगून या प्रवासात नेहमीपेक्षा वेगळाच ‘हर्षसंगम’ अनुभवता तर आलाच बघताही आला, असेही ते बोलले. घरी त्यांचे वृद्ध आई-वडील, पत्नी व मुलगी आहे. एकुलता एक मुलगा तोदेखील देश सेवेसाठी मणिपूर येथे अग्निवीर आहे. एवढे सारे व्यवस्थित असताना व त्यांचा कुठलाही विचार न करता हा बाबासाहेबांच्या रक्ताचा ‘भीमसैनिक’ नतमस्तक होण्यासाठी रस्ता ‘पार’ करतो आहे. काहीतरी विचाराच ‘गाठोड’ बांधून गावाकडं आणून सोडायच. या विचाराचा ध्यास घेऊन जीवनाचा त्यांचा हा पैदल प्रवास सुरू आहे. त्यामुळे साहजिकच १९७२ मध्ये ‘परिवार’ या सिनेमातील किशोर कुमार यांनी गायलेलं मुसाफिर हू यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है.. बस चलते जाना है.. हे गाणं आठवणार नाही तर काय ?
गणेश वाकोडे हे बुधवार ९ ऑक्टोबर रोजी कोंढाळी येथे एका बुद्ध विहारात मुक्काम करून गुरुवार १० ऑक्टोबरला ते तिथून नागपूरकडे निघणार आहेत. ११ ऑक्टोबर रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या ‘चरणी’ नतमस्तक होऊन परतीच्या प्रवासाला निघणार असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!