आचारसंहिता लागण्यापूर्वी संजय गांधी योजनांची बैठक लागणार!
- सिंदखेडराजा तहसीलदार अजित दिवटे यांची माहिती
किनगावराजा (सुरेश हुसे) – सिंदखेडराजा तालुक्यातील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार, दिव्यांग, श्रावण बाळ योजनेची बैठक विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी घेण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अजित दिवटे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना दिली आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानाचा प्रश्न निवडणुकीपूर्वी मार्गी लागण्याची शक्यता आहे.
संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, विधवा, दिव्यांग यांनी दाखल केलेल्या ऑनलाईन अर्जांची सविस्तर छाननी करूनच अर्ज प्रकरण मंजूर करण्यात येणार आहे. सदर बैठकीत बोगस फाईल नाकारण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अजित दिवटे यांनी दिली आहे.
सविस्तर असे, की सिंदखेडराजा तहसील कार्यालयांतर्गत संजय गांधी निराधार, विधवा, दिव्यांग योजनांच्या समितीच्या बैठका घेऊन या लोकांना पगार सुरू करण्यासंबंधी तब्बल एक वर्षानंतर ही बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे. तहसील कार्यालयात जवळपास दोन हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले असून, तहसीलदार यांचा टेबलावर ४५० अर्ज प्राप्त झाले आहेत. तहसील कार्यालय प्राप्त अर्जांची छाननी करून तहसीलदार यांच्या डेक्सवर सर्व अर्ज पाठविण्यात येणार असल्याची माहिती संजय गांधी विभाग प्रमुख यांनी दिली आहे.