कपाशीला बोंडेंच लागली नाही; पंचगंगा सीडस कंपनीविरोधात शेतकर्याची कृषीविभागाकडे धाव!
- वाघजाई येथील धक्कादायक प्रकार; कंपनीकडून शेतकर्यास नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – पंचगंगा सीडस कंपनीच्या कपाशी बियाण्याला एकही बोंड न लागल्याचा धक्कादायक प्रकार सिंदखेडराजा तालुक्यातील वाघजाई येथे उघडकीस आला आहे. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी विष्णू बाळाजी सानप यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी सानप यांनी कंपनीकडे नियमाप्रमाणे नुकसान भरपाई मागितली असता, कंपनीने हात वर केले आहेत. त्यामुळे शेतकरी सानप यांनी या कंपनीविरोधात कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
सविस्तर असे, की विष्णू बाळाजी सानप यांनी देऊळगावराजा येथील मल्लावत कृषी केंद्रातून आपल्या शेतात नगदी पीक कापूस लागवडीसाठी पंचगंगा सिडस कंपनीचे पोलारीस जातीचे बियाणे (गट नंबर १९१ ) वर लागवड केली. मात्र या जातीच्या कपाशीला अद्याप एकही बोंडे न लागल्याने या शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. सदर नुकसानीचा मोबदला मिळण्यासाठी शेतकरी वारंवार कंपनी प्रतिनिधीच्या संपर्कात होते. त्यानुसार कंपनी प्रतिनिधींनी शेतकर्यांच्या शेतात भेट देऊन पाहणी केली, मात्र अद्याप मोबदला दिला नसल्याने या शेतकर्यांना पंचगंगा सिडस कंपनीविरोधात कृषी विभागात तक्रार दाखल केली आहे. विष्णू सानप यांनी देऊळगावराजा येथील पंचगंगा सिडसच्या कार्यालयातील श्री वाघ यांना भेटून आपल्या कपाशी बियाण्यांबाबत तक्रार केली असता, सदर वाघ यांनी यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकारी यांना दिली. यानुसार वरिष्ठ मार्वेâटिंग अधिकारी श्री गेडाम यांनी प्रत्यक्ष शेतकरी यांच्या शेतात पाहणी केली असता, अद्याप या कपाशीला एकही बोंड न लागल्याने या शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हा या शेतकर्यांना आर्थिक नुकसान भरपाईसाठी पंचनामा करून कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांना पाठविण्यात आला. मात्र अद्याप मोबदला मिळत नसल्याने या शेतकर्यांनी कंपनीच्या प्रतिनिधींनी फोन करून मोबदल्याची मागणी केली असता, कंपनीचे प्रतिनिधी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे कंटाळून शेतकरी विष्णू सानप यांनी पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याकडे ७ ऑक्टोबररोजी तक्रार दाखल केली आहे. तसेच, मोबदला देण्याची मागणी केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, कृषीमंत्री मुंबई, जिल्हाधिकारी, बुलढाणा जिल्हा कृषी अधिकारी बुलढाणा यांना देण्यात आल्या आहेत.