ChikhaliHead lines

वीज पडून शेतकरी ठार; पत्नीसह एकजण गंभीर जखमी

- चिखलीतील संभाजीनगर येथील दुर्देवी घटना; सोयाबीन सोंगणी करतानाच काळाने घातला घाला

चिखली (तालुका प्रतिनिधी) – येथून जवळच असलेल्या संभाजीनगर परिसरातील जुना भानखेड रस्ता शिवारातील शेतात सोयाबीन सोंगणी करत असलेल्या शेतकरी दाम्पत्यावर वीज कोसळून पती जागीच ठार झाले असून, पत्नीसह अन्य एक शेतकरी गंभीर जखमी झालेले आहेत. पाऊस सुरू झाल्याने हे शेतकरी दाम्पत्य पळसाच्या झाडाखाली थांबले होते. या झाडावर अचानक वीज कोसळून आज (दि.९) सायंकाळच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. जखमींवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

सविस्तर असे, की चिखली येथील संभाजीनगर परिसरात अमोल देवीदास जाधव (वय ४२), शीतल अमोल जाधव (वय ३५), किशोर माधवराव देशमाने (वय ५९) रा. चिखली हे शेतात सोयाबीन सोंगण्यासाठी गेले होते. सायंकाळच्या सुमारास पाऊस सुरू झाल्याने हे तिघेही जण पळसाच्या झाडाखाली आडोशाला थांबले होते. या झाडावरच वीज पडल्याने अमोल देवीदास जाधव हे जागीच ठार झाले तर त्यांच्या पत्नी शीतल जाधव व अन्य एक शेतकरी किशोर देशमाने हे गंभीररित्या भाजल्याने जखमी झाले आहेत. या दोघा जखमीवर पानगोळे रूग्णालयात उपचार सुरू असून, महसूल प्रशासनाने घटनेचा पंचनामा केला आहे.

अचानक ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्याने परतीच्या पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार तडाखा दिला. त्यांमध्ये अनेक शेतातील कपाशीचे पीक जमिनीवर झोपले. तसेच अनेक सोयाबीन सुड्यावरील मेनकापड उडून गेले तर काही सुड्या झाकण्याअगोदरच सुड्यामध्ये पाणी घुसले .या तासभर पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. त्यांमध्ये या परिसरात अनेक शेतकऱ्यांनी विविध कंपनीचे कपाशी सीड घेतले आहे, मात्र या अचानक पडलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने पिकाचे अतोनात नुकसान झाले. तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
———-
दरम्यान, चिखलीसह तालुक्यात सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला असून, या पावसाने सोयाबीन, उडीद, भाजीपाला, तूर, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. दरम्यान, हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून राज्याच्या विविध भागात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. ९ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबरपर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता डख यांनी वर्तवली आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शेतकर्‍यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीन, उडीद काढला आहे, किंवा केला आहे, त्या शेतकर्‍यांनी ते झाकून ठेवावे, अन्यथा पावसाचा फटका बसू शकतो. सध्या बर्‍याच शेतकर्‍यांच्या या पिकांच्या काढणी सुरु आहेत. अशातच पाऊस आल्यास शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!