शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट!
- बुलढाण्यात आ. संजय गायकवाडांच्या पराभवासाठी ठाकरेंकडून तुपकरांना मिळणार संधी?
– विदर्भ व मराठवाड्यात महाआघाडीच्या प्रचारासाठी आक्रमक स्टार प्रचाराकाचीही उणिव भरून निघणार!
– ठाकरे-तुपकरांच्या भेटीमागे ‘पॉवरफुल’ नेत्याचा हात असल्याची मुंबईतील राजकीय वर्तुळात चर्चा
मुंबई (खास प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीत राज्यातील २५ मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची घोषणा करत, चौथी आघाडी स्थापन करणार असल्याचे सांगणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत तुपकर यांच्यामुळे शिवसेनेचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांचा निसटता पराभव झाला होता. ही चूक विधानसभेला टाळण्यासाठी ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेवरून तुपकर-ठाकरे यांची भेट झाल्याची खात्रीशीर माहितीही राजकीय सूत्राने दिली आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढत, बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून तब्बल अडिच लाख मते घेतली होती. आतादेखील त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे. तुपकरांचे उमेदवार उभे राहिले तर शेतकरी व कष्टकरी मतांचे ध्रुवीकरण होऊन त्याचा सर्वाधिक फटका हा महाआघाडीलाच बसणार होता. लोकसभा निवडणुकीतही महाआघाडीचे शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांचा तुपकरांमुळे निसटता पराभव झाला होता. त्यामुळे तुपकरांचे मन वळविण्यासाठी मध्यंतरीच्या काळात अनेक राजकीय घडामोडी झाल्यात. सद्या तरी उद्धव ठाकरे यांनी इलेक्टीव्ह मेरीट हा उमेदवारी देण्याचा निकष ठेवला असून, लोकसभेतील पराभवानंतर ते जागृक झालेले आहेत.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून रविकांत तुपकर यांना उमेदवारी द्यावी, यासाठी एक गट शरद पवार यांच्याकडे सक्रीय झाला होता. परंतु, तुपकरांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून लढावे, अशी सूचना शरद पवारांनी केल्याचे खात्रीशीर सूत्राने सांगितले आहे. तुपकरांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्याचे त्यांनी सूचित केले होते, अशीही सूत्रांची माहिती आहे. त्यानुसार रविकांत तुपकर यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री बंगल्यावर भेट घेतली असून, सविस्तर चर्चा केली आहे. तुपकर हे शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून बुलढाण्यातून उमेदवार राहणे जवळपास निश्चित असून, तुपकर हे उमेदवार राहिले तर ते शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांचा निश्चित पराभव करू शकतात, हा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’सह विविध सर्वेक्षण संस्थांचा अहवालदेखील उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचला असल्याचीही खात्रीशीर माहिती आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना अॅड. शर्वरीताई तुपकर यांनी सांगितले, की रविकांत तुपकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, त्यानंतर बुलढाणा येथे उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले. महाविकास आघाडीने रविकांत तुपकर यांना पाठिंबा दिल्यास चांगलेच होईल. बुलढाण्यात आग्या मोहोळ उठवायला रविकांत तुपकर यांच्या हाती मशाल, अशा घोषणा कार्यकर्ते देत आहेत. तसेच मी निवडणूक लढवावी की नाही, हे माझे सहकारी व शेतकरी ठरवतील, असेही शर्वरीताई तुपकर यांनी सांगितले.
शेतकरी नेते रविकांत तुपकर हे शिवसेना (ठाकरे) पक्षामार्फत महाविकास आघाडीत आल्यास, महाआघाडीला विदर्भ व मराठवाड्यातदेखील मोठा फायदा होणार आहे. कारण, ते शेतकरी चळवळीतील अग्रणी नेते आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद भूषवले, तेव्हा त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता. सर्वसामान्य, शेतकरी आणि कष्टकर्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठवणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ते अभ्यासू, परखड आणि आक्रमक भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. युवकांमध्ये त्यांची विशेष क्रेझ आहे. विद्यार्थी, तरूण, शेतकरी आणि कष्टकर्यांच्या प्रश्नांवर त्यांनी आजवर अनेक आंदोलने केली आहेत. त्यासाठी अनेकदा तुरूंगवास भोगला आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध असले तरी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ते मर्जीतील व विश्वासातील तरूण नेते आहेत. एक उमदा व शेतकरी चळवळीचा भविष्यातील चेहरा म्हणून शरद पवार हे तुपकरांकडे पाहतात.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत हे इच्छूक असून, त्यांनी मतदारसंघात गाठीभेटींचा सपाटा लावेलला आहे. रविकांत तुपकर यांना शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून बुलढाण्याची उमेदवारी मिळाल्यास बुधवर यांच्यासह जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर व काही स्थानिक नेते नाराज होण्याची शक्यता आहे. लोकसभेतील पराभवाचा अद्याप प्रा. खेडेकर यांना विसर पडलेला नाही. तथापि, रविकांत तुपकर यांना बुलढाण्यात संधी मिळाल्यास प्रा. खेडेकर यांच्यासाठी विधानसभेला मात्र कोणताही मतदारसंघ महाआघाडीत उरत नाही. कारण, चिखली काँग्रेसकडे असून, सिंदखेडराजा शरद पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे खेडेकर-बुधवत यांच्या गटाचे तुपकरांना कितपत सहकार्य मिळेल, हादेखील मोठा प्रश्न आहे.
————–