आमदार शिंगणे हे सुप्रिया सुळेंना भेटल्याची चर्चा; अन् चेहरा लपविलेल्या नेत्याचा व्हिडिओ व्हायरल!
- पुण्यात राजकीय घडामोडींना आला वेग!
पुणे (विशेष प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात विधानसभेसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरू केले असताना, काल सिंदखेडराजा मतदारसंघातील विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी खा. सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात डॉ. शिंगणे यांच्यासारखा दिसणारा एक नेता स्वतःचा चेहरा लपवित असल्याचे दिसून येत आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे एकच चर्चेला उधाण आले आहे. याबाबत डॉ. शिंगणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, सिंदखेडराजा मतदारसंघातून शरद पवार यांनी माजी आमदार तथा शिंगणे यांचे कट्टर राजकीय विरोधक तोताराम कायंदे यांना बोलावणे धाडले असून, उद्या ही बैठक होण्याची शक्यता आहे. कायंदे हे तुतारी हाती घेण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
एका मोठ्या नेत्याने मंगळवारी मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. खा. सुप्रिया सुळे यांच्या गाडीत बसून जाताना त्या व्यक्तीने आपला चेहरा लपवला होता. चेहरा लपवलेला हा व्यक्ती सिंदखेडराजा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा अजितदादा पवार गटाचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे असल्याची चर्चा कालपासून पुण्यात सुरू आहे. आपला चेहरा कॅमेरात दिसू नये, यासाठी या व्यक्तीने चेहरा फाईलच्या आड लपवला होता. आमदार राजेंद्र शिंगणे हे सद्या अजित पवार गटात आहेत. त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी शरद पवार यांच्याकडे परत येण्याच्या हालचाली सुरू केली असल्याचीही चर्चा आहे. परंतु, शरद पवार हे त्यांना परत घेण्यास तयार नसल्याचीही चर्चा आहे. माजी आमदार तोताराम कायंदे यांनी तुतारी हाती घ्यावी, अशी पवारांची इच्छा असल्याचेही त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांकडून कळते आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या गायत्रीताई शिंगणे यांनी सिंदखेडराजा येथे पत्रकाराशी बोलताना सांगितले, की डॉ. शिंगणेसाहेब मतदारसंघातच आहेत. कुणी कोठेही गेले तरी मी निवडणूक लढविणारच आहे. कोण कुठे जाणार हे मला माहिती नाही, पण मी तुतारी चिन्हावरच निवडणूक लढविणार आहे. जर मला पक्षाने उमेदवारी दिली नाही तर मात्र मी अपक्ष लढेल, असेही त्यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले.