प्रा. डी एस लहाने यांनी बांधले शिवबंधन; विधानसभेची समीकरणे बदलणार!
- बुलढाण्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट!
बुलढाणा( गणेश निकम केळवदकर) – डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचे निष्ठावान सहकारी व विधवा विवाह चळवळीमध्ये झोकून देऊन काम करणारे सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणारे प्रा.डी एस लहाने यांनी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश घेतला. मुंबई येथे मातोश्रीवर त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत ,लखन गाडेकर आदी शिवसेना नेत्यांची उपस्थिती होती. प्रा. लहाने हे अजित दादा पवार गटामध्ये सक्रिय होते. त्यांचा पक्षप्रवेश हा महायुतीसाठी धक्का मानला जात आहे.
प्रा. डी एस लहाने देऊळघाट सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य राहिले आहे. शिवसाई परिवाराच्या माध्यमातून त्यांचे सहकार क्षेत्रामध्ये मोठे काम आहे. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांची वाटचाल सुरू आहे. याच सोबत सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य राज्यस्तरावर दखलपात्र ठरले आहे. विधवा विवाह चळवळ ,विधवांना सामाजिक न्याय, समाज मान्यता मिळवून देण्यासाठी केलेली धडपड परिचित आहे. साध्या स्वभावाचे व मनमिळाऊ असणारे प्रा. लहाने शिवसेनेत आल्याने शिवसेनेची ताकद वाढणार आहे.बुलढाणा विधानसभा क्षेत्रामध्ये ही जागा जर महाविकास आघाडीत शिवसेनेला सुटल्यास जालिंदर बुधवत यांच्यानंतर शिवसेनेचे प्रबळ दावेदार लहाने ठरू शकतात.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये त्यांचे स्वागत केले.सक्रिय कार्य करण्याची अपेक्षा शिवसेनेकडून करण्यात आली आहे. यावेळी प्रा. डी एस लहाने यांनी केलेल्या सामाजिक कार्यांचा वृत्तांत उद्धव ठाकरे यांना सादर केला.
डॉ.राजेंद्र शिंगणे यांना धक्का
माजी मंत्री राजेंद्र शिंगणे हे अजित दादा पवार गटाचे मोठे नेते आहेत. त्यांचे निष्ठावान सहकारी म्हणून प्रा. डी एस लहाने यांच्याकडे पाहिले जाते. बुलढाणा येथील राष्ट्रवादीच्या सक्रिय नेत्यांमध्ये प्रा. डी एस लहाने यांचा समावेश होतो. त्यांनी डॉक्टर शिंगणे यांना सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केल्याने हा शिंगणे यांच्यासाठी देखील मोठा धक्का मानला जात आहे. तसेच तो महायुतीसाठी धक्का आहे.
जयश्री शेळके यांच्या नावाचीही चर्चा
बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या एजन्सीज कडून राजकीय सर्वे करण्यात आला त्यामध्ये जयश्री शेळके या नावावर विशेषतः विचार करण्यात आला. विद्यमान आमदारांना आव्हान देऊ शकेल असं नेतृत्व म्हणून जयश्री शेळके यांच्याकडे सध्या पाहिले जाते. जनसामान्यातून ह्या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. त्यामुळे जयश्री शेळके या नावाला मोठे वलय आहे. ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा अधून मधून होतच असते. मात्र त्याला मुहूर्त सापडलेला नाही.
तुपकरांचही नाव चर्चेत
रविकांत तुपकर हे काही बुलढाणा विधानसभा मतदारसंघापूर ते मर्यादित नेतृत्व नाही. त्यांना मानणारा वर्ग हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. शेतकरी चळवळीतून पुढे आलेले हे नेतृत्व आज राज्याच्या कानाकोपरात चिरपरिचित आहे.लोकसभेमध्ये तुपकरांनी आपले उपद्रव मूल्य सिद्ध केलं आहे. यामुळेच त्यांच्याकडे राज्यातील नेत्यांच्या नजरा देखील लागल्या आहेत. ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांमध्ये आल्यास पक्षासाठी ती जमेची बाब ठरू शकते. बुलढाणा विधानसभा लढण्याचे संकेत त्यांनी पूर्वीच दिले आहे. मात्र ते कोणत्या पक्षातून लढणार …. की अपक्ष लढणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.ऊबाठा चे तिकीट मिळाल्यास ते दमदार लढत देऊ शकतात. मात्र तुपकर यांच्या बद्दल फारशी सकारात्मक भावना स्थानिक नेत्यांची दिसून येत नाही.तुपकर, जयश्रीताई शेळके डोईजड होतील म्हणून ते पक्षातच नको… कदाचित अशी भूमिका घेतल्या जावू शकते,अशी देखील चर्चा आहे. असे झाल्यास स्थानिक नेतृत्व हेच पक्षाची वाढ खुंटवणारे ठरू शकते.
अन्यथा.. पक्षाचे मोठे नुकसान !
भारतीय जनता पक्षाचा आलेख खालावत आहे.अनेक ठिकाणी बीजेपिस धक्के बसत आहे. लोकसभेमध्ये देखील असा धक्का बसलेला आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकूणच महाविकास आघाडीसाठी वातावरण पोषक असताना तुपकर आणि जयश्रीताई शेळके यांच्यासारखे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटापासून दूर राहत असतील तर यामध्ये या नेत्या पेक्षा पक्षाचेच नुकसान अधिक होवू शकते.