जळक्या प्रवृत्तीच्या इसमाने सोयाबीनची सुडी जाळली; शेतकर्याचे लाखोंचे नुकसान!
- बोरगाव वसु शिवारातील धक्कादायक प्रकार; चिखली पोलिसांत गुन्हे दाखल
– अज्ञात आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध सुरू, लवकरच सापडणार!
चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील दिवठाणा येथील शेतकरी नारायण माधवराव इंगळे (वय ६५) यांच्या बोरगाव वसु शिवारातील साडेतीन एकरातील सोयाबीनची सुडी अज्ञात जळक्या प्रवृत्तीच्या इसमाने रात्रीच्या सुमारास आग लावून जाळून टाकली. या आगीत इंगळे यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात जळक्या प्रवृत्तीच्या आरोपीचा पोलिस कसून शोध घेत आहेत. त्याचा लवकरच शोध लागेल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, आधीच सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. त्यातच पीकविमादेखील मिळालेला नाही. त्यातच अज्ञात आरोपी सोयाबीनच्या सुड्या जाळत असेल तर शेतकर्यांनी जीव द्यायचे का, असा संतप्त सवाल करत, सुडी जाळणार्या आरोपीचा तातडीने शोध घेण्यात यावा, अशी मागणी शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी केली आहे. सरनाईक यांनी घटनास्थळी जात पीडित शेतकर्याला दिलासा दिला.
पीडित शेतकरी नारायण इंगळे यांनी चिखली पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद आहे, की दिवठाणा, ता. चिखली येथे मी परिवारासह राहतो व शेतीचा व्यवसाय करतो. माझी पत्नी सौ.सुमन नारायण इंगळे यांचे नावाने बोरगाव वसु शिवारात ०४ एक्कर शेती असून तिची मी वहीवाट करतो. सदर शेतीमध्ये आम्ही सोयाबीन व तूर पीक पेरलेले आहे. सदर शेतातील सोयाबीन अंदाजे दहा दिवासांपूर्वी सोंगून सुडी शेताच्या बांधावर लावली होती. मी दिनांक ८ ऑक्टोबररोजी दिवसभर शेतात काम करुन रात्री साडेआठ वाजेदरम्यान घरी आलो. आज (दि.९) मी माझे घरी दिवठाणा येथे होतो. तेव्हा सकाळी साडेपाच वाजता माझे जावाई देवानंद भिकाजी पर्हाड यांनी मला फोन करून सांगितले, की तुमच्या शेतातील सोयाबीनच्या सुडीला आग लागली आहे. तुम्ही शेतात या. तेव्हा मी व माझा मुलगा संतोष नारायण इंगळे असे आम्ही तातडीने बोरगाव वसू शिवारातील शेतामध्ये जावून पाहिले असता, आमच्या सोयाबीनच्या सुडीला आग लागून जळून संपूर्ण खाक झाली. कोणीतरी अज्ञात इसमाने दिनांक ०८ ऑक्टोबरच्या रात्री साडेआठ ते दिनांक ९ ऑक्टोबरच्या पहाटे साडेपाच वाजेदरम्यान माझ्या शेतात येवून सोयाबीनच्या सुडीला आग लावून अंदाजे एक लाख रूपयांचे नुकसान केले आहे. तरी, या आरोपीचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई व्हावी, अशी फिर्याद नारायण इंगळे यांनी चिखली पोलिसांत दाखल केलेली आहे.
शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहेत. त्यातच त्यांच्या मोठ्या कष्टाने पिकविलेल्या सोयाबीनच्या सुड्यांना आगी लावल्या जात असतील, तर शेतकर्यांवर आत्महत्येची वेळ येईल. तेव्हा, आरोपीला तातडीने अटक करून, अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस पाऊले उचलावी. तसेच, महसूल प्रशासनाने संबंधित पीडित शेतकर्याला तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी केली आहे. सरनाईक यांनी घटनास्थळी जाऊन पीडित शेतकर्याला दिलासा दिला. तसेच, पोलिसांची भेट घेऊन कारवाईची मागणीदेखील केली आहे.
——-