गाव तसं चांगलं, पण सरपंचाच्या दुर्लक्षामुळे वेशीला टांगलं : हिंगणा कारेगाव हे गाव बनले समस्यांचे माहेर घर
बुलडाणा( ब्रेकिंग महाराष्ट्र) :- सद्यःस्थितीत ग्रामीण भागाचा विकास हेच ध्येय केंद्र आणि राज्य सरकारच्या अजेंड्यावर आहे. परंतु, स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या हेव्यादाव्यामुळे बहुतांश गावे ही विकासापासून कोसो दूरच आहे. त्यापैकीच एक असलेले हिंगणा कारेगाव. हे गाव अतिशय धार्मिक तसेच एकजुटीने राहणारे गाव म्हणून ओळखले जाते. मात्र, विकासापासून कोसोदूरच आहे. त्यामुळे गाव तसं चांगलं, पण सरपंचामुळे वेशीला टांगलं अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
कोणत्याही गावाच्या प्रगतीचे मूल्यमापन तेथील रस्ता व दळणवळणाच्या प्रभावी व नीटनेटक्या व्यवस्थेनुसार केले जाते. गावात विकास चांगला असेल तर विकासाची गंगा वाहते. मात्र विकासच नसेल तर गावाचा विकास खुंटतो. अशीच परिस्थिती खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथे झाली आहे.
खामगाव तालुक्यात हिंगणा कारेगाव या गावात पाणी पुरवठा योजना आली. परंतु अर्धवट झाली. तसेच गावातील मागासवर्गीय वस्तीत रस्ते झाले. पण रस्त्यात पाणी साचले. आरोग्य सेवा नाही. अशा अनेक समस्यांपासून गाव विकासापासून कोसोदुर आहे. हिंगणा कारेगाव येथे शासनाच्या विविध योजनेंतर्गत प्राप्त निधीमधून सांडपाण्याचा निचरा योग्यप्रकारे होण्यासाठी सिमेंट नाल्यांची निर्मिती करण्यात आली. मात्र या नाल्यांची नेहमी साफसफाई केली जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी नाल्याऐवजी रस्त्यावरुन वाहते. नाल्या कचरा व घाणीने तुंबलेल्या असल्याने सांडपाणी नाल्यामधून वाहण्याऐवजी रस्त्यावरुन वाहाते. वस्त्यांतील नाल्यांच दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भावाने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. मात्र त्याकडे ग्रामपंचायत स्पशेल दुर्लक्ष करीत आहे. परिणामी नागरिकांना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. गावात सरपंच, ग्रामसेवक अधिकारी कुणीच फिरकून पाहत नाहीत. त्यामुळे गावात राहणारे ग्रामपंचायत सदस्यही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. गावातील समस्यांबाबत सरंपचांसोबत सदस्य बोलत का नाहीत, असा प्रश्नही नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.